आश्चर्य! पृथ्वीला बसली आतापर्यंतच्या सर्वात तेजस्वी गॅमा किरणांच्या स्फोटाची झळ
जगभरातील अॅस्ट्रोनॉमर्सना 9 ऑक्टोबर रोजी रविवारी अवकाशामध्ये एक आश्चर्यकारक, शक्तीशाली स्फोट होतानाचे दृश्य त्यांच्या टेलिस्कोपमधून दिसले.
गायत्री पिसेकार, झी मीडिया: Gamma Rays Burts : जगभरातील अॅस्ट्रोनॉमर्सना 9 ऑक्टोबर रोजी रविवारी अवकाशामध्ये एक आश्चर्यकारक, शक्तीशाली स्फोट होतानाचे दृश्य त्यांच्या टेलिस्कोपमधून दिसले. हा स्फोट इतका तीव्र होता की ज्यामधून होणारे किरणोत्सर्जनाची झळ पृथ्वीपर्यंत पोहोचली. हे उत्सर्जन गॅमा किरणांचा स्फोटामुळे (Gamma Ray Burst) झालं होतं. जे अवकाशतले सर्वात मोठ्या आणि सर्वात तेजस्वी स्फोटांपैकी एक होतं. पण हा स्फोट मोठा असला तरी पृथ्वीवरून उघड्या डोळ्यांनी दिसणारा नव्हता.
(Eastern Time) पूर्वेकडील वेळानुसार रविवारी सकाळी, आपल्या सौरमालेतून क्ष-किरण आणि गॅमा किरणांची लहर गेली. नासाच्या फर्मी गॅमा रे स्पेस टेलिस्कोप (Fermi Gamma-ray Space Telescope), निल गेहरेल्स स्विफ्ट ऑब्झर्व्हेटरी (Neil Gehrels Swift Observatory), वाईंड स्पेसक्राफ्ट (Wind spacecraft) तसेच जगातील इतर वेधशाळांतील यंत्राने ही झळ टिपली. या घटनेनंतर या प्रकाराचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील अनेक टेलिस्कोप त्या साइटकडे वळवण्यात आले. त्या दृष्टीने नवीन निरीक्षणे आणि अभ्यास सुरू करण्यात आला.
या गॅमा-रे बर्स्टला GRB 221009A हे नाव देण्यात आलं. योगायोग म्हणजे, नेमकं तेव्हा दक्षिण आफ्रिकेतील जॉहान्सबर्ग येथे दहावं फर्मी सीमपोझिअम (Fermi Symposium) सुरु होतं. फर्मी सीमपोझिअम हे संमेलन गॅमा-रे च्या अभ्यास करणाऱ्या अॅस्ट्रोनॉमरसाठी भरवण्यात येतं. त्यामुळे अभ्यासकांसाठी दुग्ध शर्करा योग जुळून आला. या संमेलनात GRB 221009A ची चर्चा रंगली.
हे सिग्नल सॅजिटा नक्षत्र (Sagitta Constellation) च्या दिशेने आले, साधारणत: १.९ बिलियन वर्षाने ते पृथ्वीपर्यंत पोहोचले असल्याचा अंदाज आहे. सॅजिटा कॉन्स्टोलेशन हे उत्तरेकडच्या आकाशात दिसणारे एक कमी प्रकाशमान नक्षत्र आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार नव्या कृष्णविवराच्या उत्पत्ती आधीचे तो स्फोट असावा. एखादा महाकाय तारा स्वत:च्याच आकारमानाने निखळताना त्यांच्या केंद्रस्थानी हे कृष्णविवर आकार घेत असल्याचा अंदाज आहे. या परिस्थितीत, हे नव्याने आकार घेणारे कृष्णविवरातून उत्सर्जित होणारे जेट्स(Jets)कण हे प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात. हे जेट्स ताऱ्यांच्या आरपार प्रवास करतात. जे अवकाशात क्ष-किरण आणि गॅमा किरण उत्सर्जित करतात.
प्राथमिक विश्लेषणानुसार, फर्मीच्या लार्ज एरिया टेलिस्कोपने (एलएटी) साधारण 10 तासांपेक्षा जास्त काळ हा स्फोट झाल्याचे शोधून काढले. बर्स्टचे तेज आणि दीर्घमानता म्हणजे इतर GRBच्या तुलनेने जास्त होती. कारण हा स्फोट आपल्या दिर्घीकेच्या जवळ असल्याचा अंदाज बांधला जात आहे. "हा स्फोट इतर GRB पेक्षा खूपच जवळचा आहे. जो रोमांचक आहे. कारण यामुळे आम्हाला अनेक तपशील शोधता येतात जे अन्यथा पाहणे खूप कठीण होईल, हा स्फोट अजूनपर्यंतचा सर्वात शक्तिशाली आणि तेजस्वी होता" असं रॉबर्टा पिलेरा यांनी सांगितलं, ज्या फर्मी (LAT) कोलॅबोरेशनच्या सदस्य आहेत.