काहिरा - वाढते वजन ही खरंतर विविध देशांतील लोकांची प्रमुख समस्या ठरली आहे. व्यायामाचा अभाव, बदलेली जीवनशैली, फास्ट फूडचे आक्रमण आणि कमी झालेली झोप यामुळे अनेक लोक या समस्येचा सामना करताना दिसतात. आतापर्यंत कोणत्याही देशाच्या प्रमुखांनी त्या देशातील लोकांच्या स्थूलपणाबद्दल जाहीरपणे वक्तव्य केले नव्हते. पण इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल फतेह अल सीसी यांनी लोकांना आपल्या वाढत्या वजनाकडे लक्ष द्या आणि ते कमी करा, असा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी ज्या लोकांचे वजन जास्त आहे, त्यांना टीव्ही कार्यक्रमात निवेदक किंवा इतर कोणत्याही भूमिकेत अजिबात दाखवू नका, असे टेलिव्हिजन चॅनेल्सला सांगितले आहे. त्यांच्या या वक्तव्याचे समिश्र पडसाद इजिप्तमध्ये पाहायला मिळतात. काही जणांनी त्यांच्या वक्तव्याला कडाडून विरोध केला. तर काही जणांनी त्याचे स्वागत केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टेलिव्हिजनवरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. जेव्हा मी घराच्या बाहेर पडतो. त्यावेळी रस्त्यावर मला स्थूल अंगकाठीचे अनेक नागरिक दिसतात. या लोकांचे वजन जास्त वाढलेले आहे. त्यांनी आपल्या जीवनशैलीकडे लक्ष दिले पाहिजे. त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शारीरिक शिक्षण हा विषय प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात बंधनकारक करण्यात यावा. जेणेकरून लहान वयापासूनच विद्यार्थ्यांना त्यांचे खाणे-पिणे आणि व्यायाम याबद्दल माहिती होईल आणि ते भविष्यात स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकतील.


अब्दुल फतेह अल सीसी यांनी सायकलवरून राष्ट्रीय लष्करी अकादमीला भेट दिली आणि तेथील विद्यार्थ्यांशी तंदुरुस्ती या विषयावर संवाद साधला. जोपर्यंत विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त होत नाहीत. तोपर्यंत त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान राष्ट्राध्यक्षांच्या या भूमिकेनंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली. वजन कमी कसे करायचे, याचा कोणताही आराखडा राष्ट्राध्यक्षांनी दिलेले नाही. नुसते वजन कमी करा, असे सांगून काय उपयोग, असा प्रश्न नागरिकांनी विचारला. मुळात देशातील गरिबीवर न बोलता वजन कमी करण्याचा मुद्दा उपस्थित करणे काहीच उपयोगाचे नाही, असेही नागरिकांनी म्हटले आहे.