Elon Musk : एलॉन मस्क यांचा ट्विटर कर्मचाऱ्यांना पहिला ईमेल; मोठी घोषणा करत म्हणाले, `कर्मचाऱ्यांनी आता...`
मस्क यांनी ट्विटरची सुत्रे हातात घेतल्यानंतर अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत
टेस्लाचे (tesla) प्रमुख एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरची (Twitter) सुत्रे हातात घेतल्यानंतर अनेक धाडसी निर्णय घेण्यास सुरुवात केलीय. एलॉन मस्क यांनी घेततेल्या निर्णयांची सध्या जोरदार चर्चा सुरुय. ट्विटरवर आता मुक्तपणे व्यक्त होता येणार आहे अशी घोषणा मस्क यांनी कंपनीची मालकी घेताच केली होती. बड्या अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यापासून ट्विटरच्या युजर्ससाठी पैसे आकारण्यापर्यंत अनेक निर्णय घेतले आहेत. यानंतर आता एलॉन मस्क यांनी कर्मचाऱ्यांना आपला पहिला ईमेल पाठवला आहे. (Elon Musk sent the first email to Twitter employees made another big announcement)
मस्क यांनी बुधवारी रात्री पाठवलेल्या या ईमेलमध्ये कर्मचाऱ्यांना आगामी काळात कठीण काळासाठी तयार राहण्यास सांगितले आहे. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, जाहिरातींवर अवलंबून असलेल्या ट्विटरसारख्या कंपनीवर आर्थिक परिस्थिती काय आहे आणि त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे वेगळे सांगण्याची गरज नाही. यासोबतच आता कार्यालयात यावे लागेल, असे मस्क यांनी स्पष्टपणे ईमेलमध्ये कर्मचाऱ्यांना सांगितले आहे.
"रिमोट वर्किंग आता शक्य नाही. कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून किमान 40 तास कार्यालयात एकत्र काम करत घालवले पाहिजेत. मात्र, जर कोणाची काही अडचण असेल तर त्याला त्यातून सवलत मिळू शकते," असे मस्क यांनी म्हटलं आहे. मस्क यांनी आतापर्यंत अनेक धक्कादायक निर्णय घेतले आहेत. त्यांनी जगभरातील ट्विटरच्या निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. यामुळे 7,500 लोकांचा रोजगार गेला आहे. भारतात ट्विटर इंडियाच्या 90 टक्के कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकण्यात आले आहे.
मस्क यांनी यूजर्सच्या बाबतीतही अनेक धक्कादायक निर्णय घेतले आहेत. येत्या काही दिवसांत, ट्विटरवर व्हेरिफाईड करुन ब्लू टिक मिळवण्यासाठी आठ डॉलर म्हणजेच अंदाजे ६६१ रुपये प्रती महिना मोजावे लागणार आहेत. याशिवाय इतर युजर्सनाही काही शुल्क भरावे लागणार आहे. ट्विटरच्या एकूण कमाईपैकी निम्मी ही व्हेरिफाईड युजर्ससाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कातून यावे असे वाटते, असे मस्क यांना वाटते. एलॉन मस्क यांना सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून कंपनीला मोठा महसूल मिळवायचा आहे.