भारताच्या हवाई हल्ल्यानंतर बालाकोटमधील एक्सक्लुझिव्ह दृष्य
भारताच्या हवाईदलाने एअर स्ट्राईक केल्यानंतर आता त्याची दृष्य सगळ्यात आधी झी मीडियाकडे आली आहेत.
नवी दिल्ली : भारताच्या हवाईदलाने एअर स्ट्राईक केल्यानंतर आता त्याची दृष्य सगळ्यात आधी झी मीडियाकडे आली आहेत. भारतीय वायुदलानं केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये जैश ए मोहम्मदचं मुख्यालय उद्ध्वस्त झालं आहे. पण इतकंच नव्हे, तर जैशचा म्होरक्या मौलाना मसूद अझहरवर मोठा मानसिक आघातही केला आहे. कारण बालाकोटशी मसूदचं भावनिक नातं आहे. बालाकोट हे पाकव्याप्त काश्मीरपासून जवळ असलेलं खैबर पख्तुनवा प्रांतामधलं एक गाव आहे. भारतात सातत्यानं अतिरेकी कारवाया करणाऱ्या जैश ए मोहम्मद या संघटनेचं बालाकोट हे मुख्यालय आहे. जैशचा प्रमुख मौलाना मसूद अझर याच्यासाठी हे गाव महत्त्वाचं आहे.
भारतीय वायुसेनेनं मंगळवारी पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील बालाकोट भागात केलेल्या हल्ल्यात 'जैश ए मोहम्मद' या दशतवादी संघटनेच्या ४२ प्रशिक्षित 'सुसाईड बॉम्बर्स'चा खात्मा झाल्याची माहिती मिळते आहे. या दहशतवाद्यांनी जैश ए मोहम्मदच्या याच बालाकोट भागातील कॅम्पमध्ये दहशतवाचं ट्रेनिंग घेतलं होतं. गुप्तचर विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार, यातील अनेक सुसाईड बॉम्बर्स 'लॉन्च पॅड'वर भारतात घुसून दहशतवादी कारवाया घडवण्याच्या प्रयत्नात होते.
बालाकोटमधील 'सईद अहमद सहीद ट्रेनिंग कॅम्प' जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर याचा मेव्हणा मौलाना युसूफ अझहर उर्फ उस्ताद गौरी हा चालवत होता. याच दहशतवादी कॅम्पला भारतीय वायुसेनेकडून मंगळवारी पहाटे ३.४५ ते ३.५३ वाजल्याच्या दरम्यान 'मिराज २०००' या लढाऊ विमानांनी लक्ष्य केलं. या एअरस्ट्राईकमध्ये जैश ए मोहम्मदचे कमीत कमी तीन कंट्रोल रुम उद्ध्वस्त केले.