नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी यंदाच्या वर्षीसाठीच्या कैलास मानसरोवर यात्रेला सुरुवात झाल्याचं जाहीर केलं. यावेळी त्यांनी यात्रेकरुंच्या पहिल्या गटाला हिरवा कंदील दाखवला. त्यांनी यात्रेच्या नियोजनात सहकार्य केल्याबद्दल चीनचेही आभार मानले. सोबतच यावेळी २०१२ मध्ये आपणही कैलास यात्रेचे वाटसरु असल्याचं सांगत त्यांनी काही आठवणींना उजाळा दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नमो नमो जी शंकरा.... असं म्हणत भारतीय आणि हिंदू संस्कृतीत अद्वितीय स्थान असणाऱ्या कैलास मानसरोवर यात्रेला सुरुवात सुरुवात झाली आहे. यंदाच्या वर्षी ८ सप्टेंबरपर्यंत ही यात्रा सुरु असणार आहे. या यात्रेचं प्रत्येक शिवभक्ताच्या मनात एक वेगळं स्थान आहे. आयुष्याच्या या प्रवासात एकदा तरी कैलास पर्वताच्या वाटेवर जाण्याचा प्रत्येकाचा मानस असतो. अशाच जवळपास दीड हजार भाविकांना यंदा या यात्रेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. 


माणशी दोन ते अडीच लाख खर्च असणाऱ्य़ा या यात्रेसाठी यंदाच्या वर्षी भाविकांना दोन गटांमध्ये पाठवण्यात येणार आहे. यात्रेसाठी प्रथम १८ तुकड्यांमध्ये प्रत्येक तुकडीत ६० यात्रेकरु पाठवण्यात येणार आहेत. त्यानंतर १० तुकड्यांमध्ये प्रत्येकी ४८ यात्रेकरु पाठवण्यात येणार आहेत.  


काश्मीरपासून भूतानपर्यंत पसरलेला हा कैलास पर्वत जमिनीपासून २२ हजार २८ फूट उंचीवर हा स्थिरावला आहे. कैलास पर्वताची एक स्वयंभू  पर्वत म्हणून ओळख असून, याचं दुसरं नाव 'ओम पर्वत' असंही आहे. 


कैलास पर्वताचं महत्त्वं


*विविध रुपांनी आणि नावांनी भाविकांमध्ये श्रद्धास्थान मिळालेला हा पर्वत 'अजय्य पर्वत' नावानेही ओळखला जातो. या पर्वताच्या शिखरापर्यंत कोणीही पोहोतू शकलेलं नसल्यामुळेच तो 'अजय्य' नावानेही प्रचलित आहे. 


*शिवपुराण, स्कंधपुराण, मत्स्यपुराणामध्ये कैलास पर्वताचा उल्लेख आहे. 


*उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही ध्रुवांच्या बरोबर मध्यभागी कैलास पर्वताचं स्थान आहे. 'अॅक्सिस मुंडी' (Axis mundi) अर्थात 'विश्वाची नाभी' म्हणूनही या पर्वताची ओळख आहे. 


*आकाश आणि पृथ्वीला जोडणारा बिंदू तसंच दहा दिशा एकत्र येण्याचं ठिकाण म्हणूनही कैलास पर्वताचा उल्लेख होतो. याच दिशांच्या एकत्रीकरणामुळे पर्वतावर अलौकीक शक्तीचा वावर असल्याचं म्हटलं जातं. 


 


चमत्कारी मानसरोवर


*इथल्या आणखी एका आश्चर्यांमध्ये नाव घेतलं जातं ते म्हणजे मानसरोवराचं. जगातील सर्वाधिक शुद्ध पाण्याचा तलाव आणि सूर्याचा आकार असणारा हा तलाव. तर इथेच असणारा चंद्राच्या आकाराचा खाऱ्या पाण्याचा तलाव हा राक्षस तलाव म्हणून जाणला जातो. या दोन्ही तलावांचा संबंध हा सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेशी आहे.


*मानवसोवराजवळ ओमकाराचे स्वर गुंजतात असंही सांगितलं जातं. शिवाय कैलास पर्वतावरुन एकाच वेळी सात प्रकारचे प्रकाश दिसतात. मनातून निर्मिती झाल्या कारणामुळे या ठिकाणाला मान: मनसरोवर / मानसरोवर म्हणून ओळखलं जातं. 


*हिंदू धर्मात या दैवी पर्वताला अनन्यसाधारण महत्त्व आहे.  शीखांचे आद्य धर्मगुरू गुरुनानक देव यांनीही य़ाच ठिकाणी ध्यानधारणा केल्याचं सांगितलं जातं.