शिकागो : श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या नामघोषाचा गजर आता अमेरिकेतही दुमदुमत आहे. श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून शिकागो येथील कालीबारी मंदिरामध्ये स्वामी समर्थांच्या मूर्तीची नुकतीच (3 एप्रिल) प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. अमेरिकेत स्वामी समर्थांची ही पहिलीच मूर्ती आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्कलकोटशी खास कनेक्शन


अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांचे ज्या वटवृक्षाखाली जवजवळ 22 वर्ष वास्तव्य होते त्या वटवृक्षाच्या खोडांपासून बनवलेल्या पादुकांची देखील कालीबारी मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यावेळी शिकागोच्या कालीबारी मंदिरात खास कार्यक्रम पार पडला. त्या कार्यक्रमाची सुरूवात पद्मश्री गायिका डॉ. पद्मजा फेनानी-जोगळेकर यांच्या सुमधूर आवाजानं झाली. पद्मजा ताई यांनी श्री समर्थ तारकामंत्र आणि इतर स्वामी भजनांची ऑनलाईन माध्यमातून स्वामींच्या चरणी स्वरपुष्पे वाहिली.


श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचे आणि पादुकांचे स्वागत मंदिरातील कलाशारोहण समारंभाने केली. त्यानंतर श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीचा अभिषेक करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी 41 कुटुंबांनी स्वामींच्या छोट्या 41 मूर्तीवर अभिषेक केला. 


कालीमाता हे आराध्य दैवत असलेल्या शिकागोच्या कालीबारी मंदिरामध्ये गजानन महाराज आणि साईबाबा यांच्या मूर्ती देखील स्थापित आहेत. त्याबरोबर आता स्वामी समर्थांची मूर्ती देखील स्थापित झाल्यानं भक्तांसाठी तीन्ही गुरूंच्या मूर्ती एकत्र असल्याचा दुर्मिळ योग जुळला आहे.


या कार्यक्रमाला अमेरिकेतील वेगवेगळ्या भागातून स्वामीभक्त मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. ढोल-ताशा आणि पालखीच्या गजरांमध्ये श्री स्वामी समर्थांच्या पालखी मिरवणूक सोहळा पार पडला. महाआरतीनं या कार्यक्रमाची सांगता झाली.