जेव्हा चंद्रावरुन पाहण्यात आलं सूर्यग्रहण, पृथ्वीने रोखला सूर्याचा मार्ग अन्...; पाहा आश्चर्यकारक VIDEO
![जेव्हा चंद्रावरुन पाहण्यात आलं सूर्यग्रहण, पृथ्वीने रोखला सूर्याचा मार्ग अन्...; पाहा आश्चर्यकारक VIDEO जेव्हा चंद्रावरुन पाहण्यात आलं सूर्यग्रहण, पृथ्वीने रोखला सूर्याचा मार्ग अन्...; पाहा आश्चर्यकारक VIDEO](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2024/04/04/724886-solar-eclipse.jpg?itok=QhFguLva)
Solar Eclipse from Moon: तुम्ही जमिनीवरुन अनेकदा सूर्यग्रहण पाहिलं असेल. पण हेच सूर्यग्रहण चंद्रावरुन कसं दिसत असेल याचा विचार तुम्ही केला आहे का? चंद्राच्या पृष्ठभागावरुन आतापर्यंत 5 वेळा असे ग्रहण पाहण्यात आले आहेत.
Solar Eclipse from Moon: 8 एप्रिल 2024 ला पूर्ण सूर्यग्रहण असणार आहे. हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी सध्या जगभरात तयारी सुरु आहे. अनेक वैज्ञानिक संस्था आणि स्पेस एजन्सी हे सूर्यग्रहण कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी सज्ज आहेत. पण हेच सूर्यग्रहण चंद्रावरुन कसं दिसत असेल याचा विचार तुम्ही केला आहे का? याचं कारण ग्रहण म्हणजे सूर्याच्या रस्त्यात चंद्र येत असतो.
चंद्रावरुन सूर्यग्रहण पाहताना चंद्र आणि सूर्याच्या मधे कोण येत असावं? आजपासून 57 वर्षांपूर्वी पहिल्यांदाच नासाच्या लूनर लँडर सर्व्हेयर 3 ने हे सूर्यग्रहण कॅमेऱ्यात कैद केलं होतं. त्यावेळी सर्व्हेयर 3 चंद्राच्या पृष्ठभागावर संशोधन करत होतं. त्याचवेळी कॅमेऱ्यात हा जबरदस्त क्षण कैद झाला होता.
सर्व्हेयर 3 ने पाहिलं की, सूर्यासमोर पृथ्वी आली होती. पृथ्वीने सूर्याला झाकलं होतं. यावेळी डायमंड रिंगही तयार झाली होती. रोबोटिक सर्व्हेयर 3 ने वाइड अँगल टेलिव्हिजन कॅमेऱ्यात हा नजारा कैद केला होता. नासाने या जुन्या फोटोंच्या आधारे एक टाइम लॅप्स व्हिडीओही तयार केला आहे.
जेव्हा पृथ्वी सूर्यासमोर आली तेव्हा तिच्या वातावरणाने सूर्यप्रकाशाची दिशा बदलली. ज्यामुळे बिीडिंग इफेक्ट पाहायला मिळाला. म्हणजेच सूर्याचा प्रकाश रोखणाऱ्या ढगांमुळे अंधार आणि त्यानंतर पुन्हा प्रकाश असं चित्र दिसत होतं. आतापर्यंत 5 वेळा चंद्राच्या पृष्ठभागावरुन सूर्यग्रहण दिसलं आहे. 2 वर्षांनी 1969 मध्ये अपोलो-12 च्या अंतराळवीरांनी पहिल्यांदा चंद्राच्या पृष्ठभागावरुन सूर्यग्रहण पाहिलं होतं. यावेळीही सूर्य आणि चंद्राच्या मधे पृथ्वी आली होती. त्यावेळी 1967 मध्ये दिसलं तसंच चित्र होतं.
2009 मध्ये, जपानच्या रोबोटिक कागुया स्पेसक्राफ्टने हाय रिझोल्यूशन फोटो काढले होते. पुढच्याच आठवड्यात, चीनच्या चांगई-3 मिशनच्या युटू रोव्हरनेही चंद्राच्या पृष्ठभागावरून सूर्यग्रहण पाहिलं होतं. तेव्हाही पृथ्वीने सूर्यप्रकाशाचा मार्ग रोखला होता.
2014 मध्ये NASA च्या LADEE मिशनने 15 एप्रिलला चंद्राच्या पृष्ठभागावरून सूर्यग्रहणाचे दृश्य टिपलं होतं. आता पुन्हा एकदा एप्रिलमध्ये संपूर्ण सूर्यग्रहण होत असून ते उत्तर अमेरिकेत दिसणार आहे.