प्रसिद्ध YouTube स्टारचा वयाच्या 30 व्या वर्षी मृत्यू; एका चुकीमुळे तरुणपणातच गमावला जीव, रश्मिकासह केलं होतं काम
Jo Lindner Death: प्रसिद्ध युट्यूब फिटनेस स्टार जो लिंडनरच्या (Jo Lindner) मृत्यूमुळे खळबळ माजली आहे. वयाच्या 30 व्या वर्षीच जो लिंडनरचं निधन झालं आहे. त्याच्या प्रेयसीने सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. धमनीविकारामुळे त्याचं निधन झाल्याची माहिती तिने दिली आहे.
Jo Lindner Death: जर्मनीतील प्रसिद्ध युट्यूब फिटनेस स्टार जो लिंडनरच्या (Jo Lindner) मृत्यूमुळे खळबळ माजली आहे. त्याला Joesthetics नावानेही ओळखलं जात होतं. वयाच्या 30 व्या वर्षीच जो लिंडनरचं निधन झालं असल्याने शोक व्यक्त केला जात आहे. त्याची प्रेयसी निचाने सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. धमनीविकारामुळे (aneurysm) त्याचं निधन झाल्याची माहिती निचाने दिली आहे. तिने इन्स्टाग्रामला एक पोस्ट शेअर करत सविस्तर माहिती दिली आहे.
जो लिंडनरच्या सोशल मीडियावर फार प्रसिद्ध होता. त्याचे इन्स्टाग्रामवर 8.5 मिलियन फॉलोअर्स आणि युट्यूबवर 9 लाखांहून अधिक सबस्क्रायबर होते. जो लिंडनर सोशल मीडियावर फिटनेससंबंधी टिप्स आणि माहिती देत असे. यामुळे तरुणाईत त्याची प्रचंड क्रेझ होती. त्याने दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंधानाच्या Pogaru चित्रपटातही काम केलं होतं.
जो लिंडनरची प्रेयसी निचाने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, धमनीविकारामुळे त्याचा मृत्यू झाला. धमनीविकार म्हणजे कमकुवत रक्तवाहिनीमुळे रक्तवाहिनीत एक फुगवटा तयार होतो. रोगामुळे लाल रक्तवाहिनीची अवाजवी वाढ होते.
निचाने पोस्टमध्ये जो लिंडनर जगातील एक गोड, मजबूत आणि उत्तम व्यक्ती होता असं म्हटलं आहे. "जो हा प्रत्येकासाठीच एक उत्तम व्यक्ती होता. काल धमनीविकारामुळे त्याचा मृत्यू झाला. मी त्याच्यासह रुममध्ये होते. यावेळी त्याने माझ्यासाठी तयार केलेला नेकलेस माझ्या गळ्यात घातला. नंतर आम्ही फक्त एकमेकाला मिठी मारुन झोपलो होतो".
दरम्यान यावेळी तिने जो लिंडनर तीन दिवसांपूर्वी मानदुखी होत असल्याची तक्रार करत होता याची माहिती दिली आहे. पण तोपर्यंत उशीर झाला होता अशीही खंत तिने व्यक्त केली.
जूनच्या सुरुवातीला, YouTuber ब्रॅडली मार्टिनच्या रॉ टॉकच्या एका भागासाठी दिलेल्या मुलाखतीत, लिंडनरने rippling muscle आजाराबद्दल सांगितलं होतं. ज्या स्थितीत स्नायू हालचाल किंवा दबावासाठी असामान्यपणे संवेदनशील असतात.
धमनीविकार हा सामान्यपणे डोकं, पाय किंवा पोटात होतो. भारतात या आजाराबद्दल फारशी माहिती नाही. यामुळे वर्षभरात अनेक लोक या आजारामुळे जीव गमावत असतात.
धमनीविकाराची लक्षणं काय?
या आजाराची लक्षणं दिसणं फार कठीण असतं आणि ही बाहेरुन कळत नाहीत. या आजारात शरिरातील एखाद्या भागात रक्तस्त्राव होणं, ह्रदयाची धडधड वाढणं, नसा प्रचंड दुखणे, चक्कर येणं, डोकेदुखी, डोळ्यांच्या वर किंवा खाली दुखणं अशा समस्या जाणवतात.