मध्यपूर्वेतल्या पाच देशांनी कतारसोबतचे संबंध तोडले
सौदी अरेबिया, इजिप्त, बहारीन, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन या पाच देशांनी कतारसोबत आपले राजनैतिक संबंध संपुष्टात आणले आहेत.
रियाद : सौदी अरेबिया, इजिप्त, बहारीन, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन या पाच देशांनी कतारसोबत आपले राजनैतिक संबंध संपुष्टात आणले आहेत. यामुळे अरब प्रदेशात तणाव वाढला असून दोहा शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.
इराणचा पाठिंबा असलेल्या काही अतिरेकी गटांना प्रोत्साहन देऊन प्रदेशात तणाव वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सौदीनं कतारवर केलाय. प्रामुख्यानं मुस्लिम ब्रदरहूड या जहाल संघटनेवर सौदीनं अंगुलीनिर्देश केलाय. झपाट्यानं घडलेल्या या राजनैतिक घडामोडींमुळे मध्यपूर्वेमध्ये तणावाचं वातावरण आहे.
सौदीसह या पाचही देशांमधला कतारचा दूतावास बंद करण्यात आलाय तसंच दोहा इथं असलेले राजनैतिक अधिकारी या देशांनी परत बोलावलेत. कतारमध्ये अमेरिकेचा या भागातला सर्वात मोठा हवाईतळ आहे. याच हवाई तळावरून इस्लामिक स्टेटविरुद्ध व्यापक प्रमाणात हवाई कारवाई करण्यात येतेय.
2022 साली कतार फुटबॉल वर्ल्ड कपचं यजमानपदही भूषणवार आहे, असं असताना अरब राष्ट्रांमध्ये निर्माण झालेली ही अस्थिरता पाश्चिमात्य राष्ट्रांचीही चिंता वाढवणारी ठरली आहे.