मोठी बातमी: अमेरिकेतील संपूर्ण विमानसेवा ठप्प; उड्डाणं रोखली, प्रवासी खोळंबले
अनेक विमानतळावर प्रवाशांचा खोळंबा झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे. अमेरिकेमध्ये दळवळणासाठी विमानसेवेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याने या तांत्रिक अडचणीमुळे एकच गोंधळ उडला आहे.
तात्रिंक बिघाडामुळे अमेरिकेतील विमानसेवा पूर्णपणे ठप्प झालेली आहे. फेडरल एव्हीएशनच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने अमेरिकेमधील एकही विमान उड्डाण घेत नसल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील हवाई वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने अमेरिकेतील हवाई उड्डाण सेवेला मोठा फटका बसला आहे. वेगवेगळ्या विमानतळांवर हजारोंच्या संख्येनं प्रवासी अडकून पडले आहेत. तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने एक हजारांहून अधिक विमान उड्डाणे रद्द झाली आहेत किंवा खोळंबली आहेत.
अमेरिकेतील फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने (एफएए) दिलेल्या माहितीनुसार देशभरातील विमान उड्डाण यंत्रणेमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळेच विमानांच्या उड्डाणांसंदर्भातील नियोजनाला फटका बसला आहे. एफएएने दिलेल्या माहितीनुसार या तांत्रिक अडथळ्यामुळे एनओटीएमएस अपडेशनला फटका बसला आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून विमानांच्या उड्डाणांच्या वेळेचं नियोजन केलं जातं. मात्र ही व्यवस्थाच कोलमडल्याने कोणतेही विमान उड्डाण घेऊ शकत नाही असं सांगण्यात आलं आहे.
'एफएए'ने ट्वीट करुन नोटिस टू एअर मिशन्स सिस्टीम रिस्टोर करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं सांगितलं आहे. आम्ही व्हॅलिडेशन तपासून पाहत आहोत आणि सर्व यंत्रणा रिलोड करत आहोत. त्यामुळेच एअरस्पेस सिस्टीमला फटका बसला आहे, असं एफएएने म्हटलं आहे.
ही यंत्रणा पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. यूनायटेड स्टेटस नोटिस टू एअर मिशन पूर्णपणे कोलमडून पडली आहे. वैमानिकांना उड्डाणासंदर्भातील सविस्तर माहिती देणारी ही यंत्रणा कोलमडून पडल्याने विमानांना उड्डाण करणं शक्य होत नसून ही सेवा पूर्ववत होईपर्यंत वाट पाहण्याशिवाय पर्याय नसल्याचं सांगितलं जात आहे. स्थानिक वेळेनुसार अमेरिकेमध्ये सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी ही तांत्रिक अडचण निर्माण झाली.