मुंबई : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी चक्क भारताचं कौतुक केलं आहे. एवढंच नाही तर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S, Jaishankar) यांचा व्हिडिओ देखील भर सभेत दाखवला. सत्तेवर असताना भारताविरुद्ध गरळ ओकायची एकही संधी न सोडणाऱ्या इम्रान खान यांनी चक्क आता भारताचं कौतूक केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्ता गेल्यानंतर भारताचं महत्त्व इम्रान खान यांना समजलंय. भारताचं आणि भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचं इम्रान खान यांनी आता तोंड भरून कौतुक केलं. पाकिस्तानच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित तहरीके इन्साफ पक्षाच्या रॅलीत त्यांनी चक्क भारतीय परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा व्हिडिओ दाखवला.


अमेरिकेचा दबाव झुगारून रशियाकडून इंधन खरेदी करण्याच्या भारताच्या निर्णयाचं त्यांनी तोंड फाटेपर्यंत कौतुक केलं.  एकीकडं भारताचं कौतूक करताना अमेरिकेपुढं नांगी टाकणा-या पाकिस्तानच्या विद्यमान शाहबाज शरीफ सरकारला खडे बोलही सुनावले आहेत.



भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश एकाचवेळी स्वतंत्र झाले. पण आज भारत प्रगत राष्ट्र बनला आहे, अमेरिकेचा दबाव झुगारून लावण्याची हिंमत भारताकडे आहे, हेच इम्रान खानच्या भाषणातून पुन्हा एकदा जगासमोर आलं आहे.