लग्नाच्या वाढदिवसादिवशी मिशेलसाठी बराक ओबामा यांनी लिहिला `हा` खास संदेश
सोशल मीडियावर चर्चा त्यांच्याच कपल गोल्सची....
मुंबई: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याविषयी काही वेगळं सांगण्याची गरजच नाही. राष्ट्रप्रमुख म्हणून तर त्यांच्या कामाची नेहमीच चर्चा पाहायला मिळाली. पण, त्यासोबतच चर्चा झाली किंबहुना अनेकांना प्रेरणा मिळाली ती म्हणजे त्यांच्या वैयक्तीक आयुष्यामुळेही.
नेता, पिता, पती, मित्र या सर्व भूमिकांसोबतच एक व्यक्ती म्हणूनही बराक ओबामा हे नेहमीच अनेकांच्या मनावर राज्य करतात.
सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या ओबामा यांनी नुकतीच केलेली एक पोस्ट नेटकऱ्यांना चक्क 'कपल गोल्स' देत आहे.
आपल्या लग्नाच्या २६ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी पत्नी मिशेलसाठी एक सुरेख असा संदेश लिहिला. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ दिल्याबद्दल त्यांनी पत्नीचे आभारही मानले आहेत.
'मिशेल... लग्नाच्या २६ व्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. एक अद्वितीय साथीदार म्हणून तू माझ्या आयुष्यात आलीस, त्याबद्दल मी तुझा आभारी आहे. तू एक अशी व्यक्ती आहेस जी माझ्या चेहऱ्यावर नेहमीच हसू खुलवते. हे सारं जग पाहण्यासाठीही ज्या व्यक्तीची साथ मला लाभलीये ती तू आहेस....', असं त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे.
ओबामा यांच्या शुभेच्छांचे मिशेल यांनीही आतापर्यंत प्रत्येक वेळी साथ दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. त्यासोबतच आयुष्याच्या प्रत्येक वळणवर त्यांची साथ देण्याची हमीही दिली आहे.
बराक आणि मिशेल ओबामा या दोघांमध्ये असणारे नात्यांचे हे सुरेख बंध नेटकऱ्यांचीही मनं जिंकून गेली.