अमेरिकेतील सर्वाधिक वादग्रस्त आणि प्रभावशाली विदेश मंत्र्यांपैकी एक असणारे डॉक्टर हेनरी किसिंजर यांचं वयाच्या 100 व्या वर्षी निधन झालं आहे. 70 च्या दशकात अनेक देशांसह राजनैतिक संबंध निर्माण करण्यात मोलाची भूमिका निभावणारे निर्णय घेतले होते. हेनरी किसिंजर यांनी त्या काळात अनेक देशांवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झाले असले तरी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना मात्र त्यांचा प्रभाव किंवा भीती याचा काही फरक पडला नव्हता. इंदिरा गांधी यांनी पूर्व पाकिस्तानात लष्करात सैन्य पाठवण्याच्या निर्णयामुळेही अमेरिका भारतावर चिडलेली होती. हा संताप इतका होता की, हेनरी यांनी इंदिरा गांधींसाठी अपशब्द वापरले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1970 च्या सुरुवातीला पूर्व पाकिस्तानात (सध्याचा बांगलादेश) देशापासून वेगळं होत स्वतंत्र देश निर्माण कऱण्याची मागणी करत आंदोलन केलं जात होतं. बंगाली लोकांकडून सुरु असलेलं हे आंदोलन पाकिस्तान लष्कर दडपण्याचा प्रयत्न करत होतं. सैन्याकडून लोकांवर अत्याचार केले जात होते. यामुळे पूर्व पाकिस्तानातून मोठ्या संख्येने लोक भारतात आश्रय घेण्यासाठी येत होते. अशा स्थितीत इंदिरा गांधींनी मोठा निर्णय घेत या लढाईत उतरण्याची घोषणा केली. इंदिरा गांधींनी पूर्व पाकिस्तानात सैन्य पाठवण्याची घोषणा केल्यानंतर पाकिस्तानच्या पराभवाच्या भीतीने अमेरिकेत खळबळ उडाली होती. त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि राज्य सचिन हेनरी किसिंजर होते. दोघांनीही भारताला रोखण्याचे प्रयत्न सुरु केले होते. 


इंदिरा गांधींना घाबरवण्याचा प्रयत्न अयशस्वी


भारतीय लष्कराने पूर्व पाकिस्तानात दखल देऊ नये अशी हेनरी किसिंजर यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी इंदिर गांधींवर दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. किसिंजर यांच्या सांगण्यावरुन रिचर्ड निक्सन यांनी इंदिरा गांधींचा अपमान करत त्यांना भेटीसाठी ताटकळत ठेवलं. यानंतर भेटीदरम्यान रिचर्ड निक्सन यांनी इंदिरा गांधींशी फार उद्धटपणे संवाद साधत पाकिस्तानवर हल्ला करण्यापासून थांबवण्यासाठी दबाव टाकला. पण इंदिरा गांधी यांनी त्यांना स्पष्टपणे नकार दिला होता. पूर्व पाकिस्तानातील घटनांमुळे भारतात संकट निर्माण झालेलं असताना आम्ही शांत बसू शकत नाही असं सांगत इंदिर गांधी यांनी निर्णय बदलण्यास नकार दिला. यानंतर इंदिरा गांधी अमेरिकेतून परतल्या आणि भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये हल्ला केला. 


भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्याचं समजल्यानतंर किसिंजर संतापले होते. हा संताप इतका होता की, त्यांनी राष्ट्राध्यक्ष निक्सन यांच्याशी संवाद साधताना इंदिरा गांधींचं नाव न घेता अपशब्द वापरले होते. फक्त किसिंजरच नाही तर राष्ट्राध्यक्षांनीही यावेळी भारतीयासांठी वाईट शब्द वापरले होते. 


किसिंजर यांनी त्यावेळी चीनचा दौरा केला होता आणि निक्सन यांना सल्ला दिला होता की, चीनला भारतीय लष्कराजवल सैन्य पाठवण्यास सांगा जेणेकरुन ते पाकिस्तानविरोधातील युद्ध बंद करतील. चीनने नकार दिल्यानंतर किसिंजर यांच्या आदेशानुसार, अमेरिकन नौदल पाकिस्तानच्या मदतीसाठी पुढे आलं होतं. पण रशियामुळे त्यांना माघार घ्यावी लागली होती. 


हेनरी किसिंजर यांनी 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर 2005 मध्ये, इंदिरा गांधींना अपमानास्पद आणि भारतीयांबद्दल अपमानास्पद शब्द वापरल्याबद्दल जाहीरपणे माफी मागितली होती.