`या` देशात लागला महिन्याभराचा लॉकडाऊन....घरापासून 10 कि.मी. पेक्षा लांब जाता येणार नाही
युरोपातील देशांमध्ये कोरोनाचं संकट जाता जात नाहीये. फ्रान्समध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लगाल्यानं एका महिन्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आला आहे.
मुंबई : युरोपातील देशांमध्ये कोरोनाचं संकट जाता जात नाहीये. फ्रान्समध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लगाल्यानं एका महिन्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आला आहे.
फ्रान्सचे पंतप्रधान जीन केस्टेक्स यांनी याबाबत घोषणा केली आहे. राजधानी पॅरिससह 16 ठिकाणी एका महिन्याचा लॉकडाऊन आज मध्यरात्रीपासून लागू होईल.
शाळा तसंच अत्यावश्यक सेवा पुरवणाऱी दुकानं मात्र सुरू ठेवायला परवानगी देण्यात आली आहे. सार्वजनिक स्थळी जमणे, घरीही खूप लोक जमतील असे कार्यक्रम आयोजिक करणे यांसारख्या गोष्टींना परवानगी नसेल. फ्रान्समध्येही जास्तीत जास्त लोकांनी वर्क फ्रॉम होम करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
रात्रीच्या वेळी कर्फ्यूही लावण्यात येणार आहे. दिवसाही घरापासून 10 किलोमीटर पेक्षा दूर जाता येणार नाही. आता वाढणारा कोरोनाचा संसर्ग हा कोरोनाची तिसरी लाट असल्याचं पंतप्रधान जीन केस्टेक्स यांनी म्हटलंय.
फ्रान्समध्ये आतापर्यंत 42 लाखांहून अधिकांना कोरोनाची लागण झालेली आहे, तर 91 हजाराहून अधिक जणांना कोरोनामुळे आपले जीव गमावले आहेत.
याआधीही फ्रान्स, स्पेन, इटली, इग्लंड यांसारख्या युरोपीय देशांमध्ये कोरोनाचा कहर झालेला. इंग्लंडमध्येही अऩेकदा लॉकडाऊन लावण्यासारखी परिस्थिती ओढावली. त्यात आता फ्रान्समध्येही तिसऱ्यांदा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. वारंवार लागणाऱ्या लॉकडाऊनमुळे युरोपीय देशांच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होण्याचा धोका आहे.