नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या मुद्यावर प्रत्येक देशाचं लक्ष लागून आहे. या तणावाबाबत फ्रान्सचे संरक्षणमंत्री फ्लोरन्स पार्ले यांनी सोमवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहिले. गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या 20 जवानांना फ्रान्सने श्रद्धांजली वाहिली आणि या कठीण काळात आपण भारतासोबत असल्याचे म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्रान्सचे संरक्षणमंत्री फ्लोरेन्स यांनी लिहिले की, 20 सैनिक गमावणे हा मोठा धक्का आहे, केवळ त्याच्या कुटुंबासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी. या कठीण परिस्थितीत आम्ही फ्रेंच सैन्याच्या वतीने आमचा पाठिंबा दर्शवितो. याशिवाय ते लवकरच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना भारतात भेटणार आहेत. ज्यामध्ये पुढील चर्चा होईल.


चीनबरोबर सुरू असलेल्या वादात फ्रान्स हा भारताचा महत्त्वाचा भागीदार म्हणून पुढे आला आहे. कारण कोरोना संकटामुळे राफेल लढाऊ विमानाच्या डिलिव्हरीला ब्रेक लागला होता. आता फ्रान्सने लवकरात लवकर लढाऊ विमानं देणार असल्याचं म्हटलं आहे.


एवढेच नाही तर सुरुवातीला ४ राफेल लढाऊ विमान भारताला देण्यात येणार होते, पण सध्याची स्थिती पाहता आता ६ लढाऊ विमानं भारताला देण्यात येणार आहेत. जुलै महिन्याच्या अखेरीस ते भारतात पोहोचतील. गेल्या वर्षी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्ये जाऊन विमानं पाहिली होती. त्यानंतर भारतीय हवाई दलाचे पायलट या विमानांचे प्रशिक्षण घेत होते.


आता २२ जुलै पर्यंत भारताला ६ लढाऊ विमान मिळतील, जे आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असतील. अंबाला एअरबेसजवळ ही विमाने तैनात केली जातील, जेणेकरून उत्तरेकडील भागात आवश्यक असल्यास ते त्वरित वापरता येतील. सध्या लडाख सीमेवर चीनबरोबर असलेल्या तणावामुळे राफेल मिळणं भारताला खूप फायदेशीर ठरू शकते.


फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांपूर्वी इतर अनेक देशांच्या प्रमुखांनी आणि मोठ्या नेत्यांनी चीन वादावर भारताला पाठिंबा दर्शविला आहे. आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह या विषयावर अमेरिकेच्या संरक्षण सचिवांशी फोनवर चर्चा करतील आणि ताज्या परिस्थितीवर चर्चा केली जाईल.