Turkey Earthquake: तुर्कीमध्ये (Turkey) पुन्हा एकदा भूकंपाचा (Earthquake) धक्का बसला आहे. यावेळी हा भूकंप 5.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. आपातकालीन विभागाच्या माहितीनुसार, सेंट्रल तुर्कीमधील Nigde हे भूकंपाचं केंद्र होता. तुर्की भूकंपातून सावरत असतानाच नव्याने भूकंपाचा धक्का जाणवल्याने पुन्हा एकदा नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. तुर्कीत काही आठवड्यांपूर्वी आलेल्या भूकंपात 50 हजाराहून अधिक नागरिकांनी आपला जीव गमावला असून शेकडो घरं उद्ध्वस्त झाली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील अनेक नागरिक बेघर झाल्याने तुर्की सध्या नव्याने घऱं उभारत आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, 6 फेब्रुवारी रोजी आलेला भूकंप आणि त्यानंतर जाणवलेल्या 40 धक्क्यांमध्ये तुर्कीमध्ये 5 लाखांहून अधिक घरं असलेल्या एक लाखाहून अधिक इमारती कोसळल्या असून गंभीरपणे नुकसान झालं आहे. 


आपत्ती आणि आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने (The Disaster and Emergency Management Authority) दिलेल्या माहितीनुसार, तुर्कीत भूकपामुळे मृत्यू झालेल्या संख्या शुक्रवारपर्यंत 44 हजार 218 वर पोहोचली होती. तसंच सिरियामध्ये 5914 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दोन्ही देशातील भूकंप पीडितांची संख्या एकत्र केल्यास 50 हजारांच्या पुढे जात आहे. 


तुर्कीमध्ये महिन्याभरात निवडणुका होणार असून राष्ट्राध्यक्ष Tayyip Erdogan यांनी जनतेला एका वर्षात नवीन घरं बांधून देण्याचं आश्वासन दिलं आहे. मात्र यावेळी तज्ज्ञांनी प्रशासनाने वेगापेक्षा सुरक्षेला प्राधान्य द्यावं असं स्पष्ट सांगितलं आहे. काही इमारती भूकंपात हादरे सहरन करु शकतील अशा पद्धतीने उभारण्यात आल्या होत्या. मात्र त्यादेखील पत्त्याप्रमाणे कोसळल्या. 


दरम्यान सरकारने बेघर झालेल्या अनेक लोकांसाठी तंबू उभारले आहेत. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, तुर्की सरकारने 2 लाख अपार्टमेंट्स आणि ग्रामीण भागात 70 हजार घरं उभारण्याची योजना आखली आहे. भूकंपामुळे 15 लाख लोक बेघर झाले असून 5 लाख नव्या घरांची गरज आहे.