फ्रान्समध्ये इंधन करानंतर दंगल भडकली, चळवळीचे हिंसाचारात रुपांतर
फ्रान्समध्ये इंधनावर लावलेल्या करानंतर भडकलेल्या दंगली शमण्याची चिन्हं नाहीत. `यलो वेस्ट्स` चळवळीचं हिंसाचारात रुपांतर झाल्याचं पाहायला मिळतंय.
पॅरिस : फ्रान्समध्ये इंधनावर लावलेल्या करानंतर भडकलेल्या दंगली शमण्याची चिन्हं नाहीत. गेल्या दोन आठवड्यांपासून राजधानी पॅरिससह देशाच्या अनेक भागांमध्ये 'यलो वेस्ट्स' चळवळीचं हिंसाचारात रुपांतर झाल्याचं पाहायला मिळतंय. या पार्श्वभूमीवर बुधवारी फ्रान्सच्या संसदेमध्ये कर सुधारणेच्या प्रस्तावावर चर्चा सुरू झालीये.
इंधनावरील करांमध्ये पुढले ६ महिने वाढ न करण्याचा प्रस्ताव पंतप्रधान एड्युअर्ड फिलिपी यांनी मांडलाय. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या १८ महिन्यांमधील कारकिर्दीतलं पहिलंच मोठं घूमजाव ठरणार आहे.
अतिउजव्या आणि अतिडाव्या संघटनांनी इंधनावरील करवाढीला विरोध केलाय. गुरूवारीही काही भागामध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्याचं बघायला मिळालं. दरम्यान, शनिवारी 'यलो वेस्ट्स'नं पुन्हा निदर्शनांची हाक दिली असल्यामुळे मॅक्रॉन यांनी देशात आणीबाणी जाहीर करावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे.