मुंबई : आतापर्यंत तुम्ही धबधबा पाण्याचाच पाहिला असेल. पण हवाई बेटांवर ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या तप्त लाव्हारसाचा धबधबा आहे. या ठिकाणी ज्वालामुखीतला लाव्हारस शंभर मीटर उंचीवरुन थेट समुद्रात कोसळतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रशांत महासागरातल्या हवाई बेटांवरचा निसर्ग डोळ्यांचं पारणं फेडणारा आहे. चारही बाजुनं समुद्रानं वेढलेली ही हवाई बेटं अतिशय सुंदर आहेत. पण या सौंदर्यावर एक काळा डाग आहे. तो डाग म्हणजे हवाई बेटांवरचे जागृत ज्वालामुखी.... हवाई बेटांवर पाच जागृत ज्वालामुखी आहेत. त्यापैकी एक आहे किलियुगा ज्वालामुखी.... हा ज्वालामुखी म्हणजे एक धबधबाच आहे. 


किलियुगा ज्वालामुखीतला लाव्हारस थेट समुद्रात धबधब्यात कोसळतो. लालबुंद रंगाचा हा लाव्हारस जेव्हा समुद्रात कोसळतो तेव्हा वाफेचे एकच लोट तयार होतात. समुद्र जणू या लाव्हारसाला थंड करण्यासाठी इरेला पेटलेला असतो. पण ना लाव्हारस थांबत ना समुद्राच्या लाटा थांबत. रात्रीच्या काळोखात तर हा लाव्हारसाचा धबधबा पाहणं म्हणजे एक पर्वणीच असते. शंभर फूट उंचावरून हा धबधबा जेव्हा समुद्रात कोसळतो तेव्हा बॉम्बस्फोटासारखे आवाज होतात.


धोकादायक असतानाही अनेक पर्यटक किलियुगाच्या जवळ जाऊन हा धबधबा पाहतात. १९८३पासून किलियुगा ज्वालामुखीचा उद्रेक काही दिवसांच्या अंतरानं होत असतो. नुकताच फेब्रुवारी २०१७मध्ये या ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. लाव्हारस जेव्हा मोठ्या क्षमतेनं वाहतो तेव्हा जणू समुद्राला आग लागल्याचा भास होतो. हा धबधबा जेवढा आकर्षक आहे तेवढाच धोकादायकही आहे. पण लाव्हारसाचा धबधबा पाहण्यासाठी काही धाडसी पर्यटक हा धोका पत्करताना दिसतात.