Giraffe Poop Seized At Airport: काही लोकांच्या इच्छा ऐकून आपल्याला धक्का बसतो. जगापेक्षा वेगळं काहीतरी करण्याच्या नादात लोकांच्या मनात अशा काही फॅण्टसी असतात की त्या ऐकल्यानंतर कपाळावर हात मारण्याची इच्छा नक्कीच होते. मात्र आपल्या या फॅण्टसी पूर्ण करण्यासाठी लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात. काही लोकांच्या याच विचित्र सुप्त इच्छा ऐकून काय प्रकार आहे हा? असा प्रश्न पडतो. असाच काहीसा प्रसंग अमेरिकेमधील मिनेसोटा येथील एका महिलेसंदर्भात घडला आहे. 


विमानतळावर नक्की घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेत राहाणारी ही महिला चक्क जिराफची विष्ठा घेऊन विमानामधून प्रवास करण्याच्या प्रयत्न असतानाच तिला कस्टमच्या अधिकाऱ्यांनी अडवलं. ही महिला केनियावरुन जिराफची विष्ठा एका डब्ब्यात घेऊन अमेरिकेला जाणारं विमान पकडून अमेरिकेत उतरलीही. मात्र विमानतळावरुन बाहेर पडत असतानाच तिला कस्टम अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं. पोलिसांनी जिराफाची विष्ठा असणारा हा डब्बा जप्त केला आहे. जिराफाच्या विष्ठेचं या महिलेला काय करायचं होतं असा प्रश्न कस्टमच्या अधिकाऱ्यांनाही पडला. मात्र या महिलेने त्यांच्या प्रश्नाला दिलेलं उत्तर ऐकल्यानंतर कस्टमचे अधिकारीही बुचकळ्यात पडले. आपल्याला जिराफची विष्ठा वापरुन गळ्यात घालायचा नेकलेस बनवण्याची इच्छा असून त्यासाठीच मी ती डब्यात भरुन मायदेशी नेत होते असं या महिलेने कस्टमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं. या महिलेने जिराफची विष्ठा ठेवलेल्या बॉक्समध्ये एक मोठ्या आकाराचा गोगलगायचा शंकही कस्टम अधिकाऱ्यांना सापडला.


यापूर्वीही केला आहे असा प्रकार


या महिलेनं दिलेलं स्पष्टीकरण ऐकून कस्टमचे अधिकारी गोंधळले. मात्र त्यांनी या महिलेला यापूर्वीही तू असा प्रकार केला आहे का? असा प्रश्न विचारला. त्यावर या महिलेने, होय असं उत्तर दिलं. आपण यापूर्वी हरणाची प्रजाती असलेल्या बाराशिंगा या प्राण्याची विष्ठा नेऊन त्यापासून नेकलेस बनवला होता आणि तो अनेकदा परिधान केला होता असं अधिकाऱ्यांना सांगितल्याचं 'मनी कंट्रोल'ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. हे ऐकूनही अधिकाऱ्यांना धक्का बसला. 


महिलेविरोधात कठोर कारवाई नाही कारण...


समोर आलेल्या माहितीनुसार, अमेरिकेमध्ये जिराफची विष्ठा नेणं फार कठीण मानलं जातं. 'मिनेसोटा पब्लिक रेडिओ'ने दिलेल्या माहितीनुसार, अशाप्रकारे जिराफची विष्ठा आणण्यासाठी परवानगी लागते आणि तिची चाचणी करणेही आवश्यक असतं. या महिलेने आपण विष्ठा आणत असल्याचं लपवलं नव्हतं आणि तिने यावर कस्टम ड्युटीही भरली होती त्यामुळे तिच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात आली नव्हती, असं 'मिनेसोटा पब्लिक रेडिओ'ने म्हटलं आहे. आफ्रिकेमध्ये स्वाइन फ्लू, न्यूकॅसल रोग आणि पाय तसेच तोंडासंदर्भातील आजार प्राण्यांच्या विष्ठेच्या माध्यमातून पसरतात. म्हणूनच अमेरिकेमध्ये अशाप्रकारे प्राण्यांच्या माध्यमातून निर्माण झालेले किंवा उत्पादन घेतलेले पदार्थ अथवा गोष्टी आणण्यासंदर्भातील नियम अधिक कठोर आहेत.