WWE मधला केन झाला या शहराचा महापौर
केनच्या चर्चेत येण्यामागचे कारण ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसेल.
न्यूयॉर्क: साधारण नव्वदीच्या दशकापासून WWE हा खेळ तरुण पिढीमध्ये लोकप्रिय आहे. हल्ली या खेळाची क्रेझ ओसरली असली तरी नव्वदीत तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या अनेकांना या खेळाने भुरळ घातली होती, ही गोष्ट विसरुन चालणार नाही. याच काळात केन हा पहिलवान अनेकांच्या मनात धडकी भरवायचा. त्यामुळे लोकांना मुखवट्यामागील त्याचा चेहरा आणि इतर गोष्टींबद्दल प्रचंड उत्सुकता होती. हाच केन आता पुन्हा एकदा चर्चेत आहे.
यावेळी केनच्या चर्चेत येण्यामागचे कारण ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसेल. केनचे खरे नाव ग्लेन जेकब्स आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी अमेरिकेच्या टेनेन्से प्रांतातील क्नॉक्स कंट्री या शहरातील महापौरपदाची निवडणूक जिंकली.
लिंडा हॅने यांना पराभूत करत ग्लेन जेकब्स महापौरपदी विराजमान झाले. रिपब्लिकन पक्षाकडून लढणाऱ्या जेकब्स यांना ३१,७३९ मते मिळाली तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या हॅने यांना १६, ६११ मते मिळाली.
अशाप्रकारची कामगिरी करणारे ग्लेन जेकब्स हे WWE मधील दुसरे खेळाडू ठरले आहेत. यापूर्वी जेसे वेंचुरा यांनी अमेरिकेतील ब्रुकलीन पार्कचे महापौर होण्याचा मान मिळवला होता.