Relationship News : नात्यांचा पाया फक्त विश्वासच नव्हे, तर इतरही काही निकषांवर आधारलेला असतो. प्रत्येक नात्यामध्ये हे निकष वेगवेगळे असू शकतात. त्यांना दिलं जाणारं प्राधान्यही तितकंच वेगळं असू शकतं. अशा या गुंतागुतीच्या नात्यात अडकून न राहता एका सेलिब्रिटी जोडीनं वैवाहिक आयुष्याच्या प्रवासातून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. ही जोडी म्हणजे गुगलचे सहसंस्थापक सर्जी ब्रिन आणि त्यांची पत्नी निकोल शनाहन. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्यावसायिका आणि वकील अशी ओळख असणाऱ्या निकोलचं टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांच्याशी प्रेमसंबंध असून, त्यांचं हे नातं आता जगापासून लपून राहिलेलं नाही. ज्यामुळं निकोल आणि सर्जी यांच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जात आहे. न्यायालयीन कागदपत्रांमध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार निकोल आणि सर्जीच्या घटस्फोटाची प्रक्रिया 26 मे रोजी पूर्ण झाली. ज्यानंतर त्यांच्या 4 वर्षीय मुलीचे हक्क त्या दोघांनाही विभागून देण्यात आले. 


2015 मध्ये सुरु झालेलं नातं... 


2015 मध्ये निकोल आणि सर्जी यांनी एकमेकांना डेट करण्यात सुरुवात केली होती. 2018 मध्ये त्यांनी या नात्याला लग्नाचं नाव दिलं. पहिल्या लग्नानंतर सर्व न्यायालयीन कामं पूर्ण केल्यानंतर सर्जी आणि निकोल यांनी लग्नाचं पाऊस उचललं होतं. पण, 2021 नंतर मात्र त्यांनी विभक्त राहण्यास सुरुवात केली. 


हेसुद्धा वाचा : ड्रोन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...; पुतिन यांनी आपल्या उत्तर कोरियाच्या मित्राला दिल्या जगावेगळ्या भेटवस्तू


 


2022 मध्ये सर्जी यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला. एलॉन मस्क यांच्यासोबत निकोलच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आणि त्यानंतर एका महिन्यातच त्यांनी हा निर्णय घेतला होता. निकोल आणि एलॉन मस्क यांची ओळख नवी नाही. हे दोघंही एकमेकांना फार आधीपासूनच ओळखतात. पण, त्यांनी अफेअरच्या चर्चा मात्र वारंवार झुगारून लावल्या. इतकंच नव्हे तर सर्जी आणि एलॉन मस्कही एकमेकांचे चांगले मित्र होते असं सांगण्यात येतं. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार निकोलसोबतच्या अफेअरची माहिती मिळताच सर्जी यांनी मस्क यांच्यासोबतची मैत्री तोडली होती. पण, मस्क यांनी मात्र ही अफवाच असल्याचं स्पष्ट केलं होतं.