`अब्बू, मी 10 यहुदींना ठार केलं आहे,` हत्याकांडानंतर हमासच्या दहशतवाद्याचा वडिलांना फोन, ऐका संपूर्ण ऑडिओ क्लिप
इस्त्रायलच्या विदेश मंत्रालयाने एक ऑडिओ क्लिप जारी केली आहे. यामध्ये हमासमधील तरुण आपल्या वडिलांना फोन करुन आपण 10 यहुदींना ठार केलं असल्याचं सांगतो. हे ऐकल्यानंतर त्याचे आई-वडीलही फार आनंदी होतात.
इस्त्रायल आणि हमास यांच्यात गेल्या 2 आठवड्यांपासून युद्ध सुरु आहे. यादरम्यान इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक्सवर एक ऑडिओ क्लिप पोस्ट केली आहे. यामध्ये हमासचा दहशतवादी फोनवरुन त्याच्या वडिलांशी बोलत असल्याचं ऐकू येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कॉलदरम्यान, महमूद नावाचा हा तरुण आपल्या वडिलांना आपण कशाप्रकारे 10 यहुदींना ठार केलं हे अभिमानाने सांगत आहे. ही ऑडिओ क्लिप 7 ऑक्टोबरची आहे.
जेव्हा हमासच्या हल्लेखोरांनी दक्षिण इस्त्रायलमध्ये घुसखोरी करत हत्या सुरु केल्या होत्या तेव्हा हा फोन केला होता. हमासच्या या तरुणाने हत्या केलेल्या एका यहुदी महिलेच्या फोनवरुन वडिलांना फोन केला होता अशी माहिती आहे. या महिलेचा मृतदेह दोन आठवड्यांनी इस्त्रायली लष्कराला सापडला होता.
इस्त्रायलच्या विदेश मंत्रालयाने ही ऑडिओ क्लिप शेअर केली आहे. यामध्ये हमासचा हा तरुण आपल्या वडिलांना फोन करुन आपण 10 यहुदींना ठार केलं असल्याचं सांगतो. हे ऐकल्यानंतर त्याचे आई-वडीलही फार आनंदी होतात.
ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे?
महमूद - हॅलो डॅड. डॅड. मी मेफल्सिममध्ये आहे. तुमचं व्हॉट्सअप पाहा, मी माझ्या हाताने किती लोकांना मारुन टाकलं आहे. तुमच्या मुलाने यहुदींना ठार केलं आहे.
वडील - अल्लाह-हू-अकबर. अल्लाह-हू-अकबर. देव तुमची रक्षा करो.
महमूद - हे मेफल्सिमच्या आतील चित्र आहे. मी एका यहुदीच्या मोबाईलवरुन तुम्हाला फोन करत आहे. मी तिच्या पतीला ठार केलं आहे. माझ्या हातून मी 10 यहुदींची हत्या केली आहे.
वडील - अल्लाह-हू-अकबर.
महमूद - तुमचा फोन तपासा आणि मी किती लोकांना मारलं आहे पाहा. मी तुम्हाला व्हॉट्सअप कॉल करत आहे.
वडील - रडू लागतात (कदाचित आनंदाने)
महमूद - मी आपल्या हातांनी 10 जणांना ठार केलं आहे. त्यांचं रक्त माझ्या हाताला आहे. मला आईशी बोलायचं आहे.
आई - माझ्या मुला...अल्लाह तुझी रक्षा करो.
महमूद - मी एकट्यानेच 10 जणांना ठार केलं.
वडील - अल्लाह तुला सुरक्षित घऱी पोहोचवू दे.
महमूद - अब्बू, तुम्ही व्हॉट्सअप सुरु करा, मला व्हिडीओ कॉल करायचा आहे
आई - मी तिथे तुझ्यासोबत असायला हवं होतं.
महमूद - अम्मी, तुझा मुलगा हिरो आहे. अल्लाहच्या मदतीने येथे येणारा मी पहिला होतो.
महमूदचा भाऊ - महमूद तू आता गाझाला परत ये, बास झालं. आता परत ये.
महमूद - आता परत येणार नाही. एकतर विजय होईल किंवा शहीद होईन. आईने मला इस्लामसाठी जन्म दिला आहे. आता कसा परत येऊ? व्हॉट्सअपला पहा मी किती जणांना ठार केलं आहे.
7 ऑक्टोबरपासून सुरु आहे युद्ध
7 ऑक्टोबरला हमासने गाझा पट्टीवरुन इस्त्रायलवर 5 हजारांहून अधिक रॉकेट्स डागत हल्ला केला होता. यानंतर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासविरोधात युद्धाची घोषणा केली होती.
दोन आठवड्यांच्या युद्धात गाझा पट्टी पूर्णपणे उद्धवस्त झाली आहे. पॅलेस्टाइनचे विदेश मंत्री रियाल अल-मलिकीने दावा केला आहे की, इस्त्रायलच्या बॉम्बहल्ल्यात आतापर्यंत 5700 हून अधिक नागरिक ठार झाले आहेत. यामध्ये 2300 हून अधिक मुलं आणि 1300 हून अधिक महिला आहेत. तर हमासच्या हल्ल्यात इस्त्रायलमधील 1400 नागरिक ठार झाले आहेत. हमासने 200 हून अधिक नागरिकांना ओलीस ठेवलं आहे.