मोठा खुलासा : शिंजो आबे यांना मारायचं नव्हतं, पण नंतर आरोपीने बदलला प्लान
आरोपीने का केली शिंजो आबे (shinzo abe) यांची हत्या. याबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे.
टोकियो : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (shinzo abe) यांच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. क्योडो न्यूजनुसार, हल्लेखोर तेत्सुया यामागामीने सुरुवातीला जपानच्या माजी पंतप्रधानांवर हल्ला करण्याची योजना आखली नव्हती. क्योडोने पोलीस सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
रिपोर्टनुसार, यामागामीने पोलिसांना सांगितले की, त्याला एका धार्मिक संघटनेच्या नेत्यावर हल्ला करायचा होता. हल्लेखोराचा दावा आहे की धार्मिक नेत्याने त्याच्या आईची फसवणूक केली होती. यामागामीचा असा विश्वास होता की माजी पंतप्रधान आबे (Ex pm shinzo abe) यांनी देशात त्या संस्थेचा प्रचार केला होता. हे पाहून मग आबे यांना ठार मारण्याची योजना आखली.
यामागामीने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, आबे यांनी याआधी ज्या ठिकाणी भाषणे दिली होती त्या ठिकाणीही तो गेला होता. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यामागामी याने कोणत्याही राजकीय मतभेदामुळे माजी पंतप्रधानांची हत्या केल्याचा इन्कार केला आहे.
शिंजो आबे यांचे पार्थिव शनिवारी टोकियो येथे आणण्यात आले. आबे यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले परंतु मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी हल्लेखोराला जागीच पकडले. तो जपानी नौदलाचा माजी सदस्य आहे.