चार दिवस कामाचे, बाकी सगळे आरामाचे... या देशातील सरकारचा प्रस्ताव
पंतप्रधान सना मारिन यांची जगातील सर्वात तरुण पंतप्रधान अशी ओळख आहे
नवी दिल्ली : एखाद्या स्वप्नवत वाटावा असा हा निर्णय एका देशानं आपल्या नागरिकांचं स्वास्थ्य आणि हित लक्षात घेऊन घेतलाय. होय... जगात असाही एक देश आहे जो आपल्या नागरिकांसाठी केवळ चार दिवस कामाचे राखणार आहे. बाकीचे तीन दिवस आपल्या नागरिकांना आराम मिळेल, याचा विचार इथलं सरकार करत आहे... आपण बोलतोय 'फिनलँड' या देशाविषयी...
फिनलँडच्या पंतप्रधान सना मारिन यांची जगातील सर्वात तरुण पंतप्रधान अशी ओळख आहे. सना यांनी आठवड्यात केवळ चार दिवस आणि दिवसाला सहा तास काम असा प्रस्ताव कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत ठेवलाय. हा प्रस्ताव संमत झाला तर असा निर्णय घेणार फिनलँड हा पहिलाच देश ठरेल.
आपल्या देशातील नागरिकांनी काम तर करावंच परंतु, कामासोबतच त्यांनी आपल्या कुटुंबीयांना आणि जवळच्या व्यक्तींना जास्तीत जास्त वेळ द्यावा, असं इथल्या सरकारला वाटतंय. कौटुंबिक स्वास्थ्य मिळाल्यामुळे देशाची उप्तादन क्षमताही वाढेल, असा विश्वास फिनलँडच्या पंतप्रधान सना मारिन यांनी व्यक्त केलाय.
यासाठी, सना मारिन यांनी आपल्या शेजारच्याच स्वीडन या देशाचं उदाहरणही दिलंय. २०१५ मध्ये आठवड्यातील केवळ ६ तास काम करण्याचा निर्णय स्वीडननं घेतला आणि त्याचा क्रांतिकारी सकारात्मक परिणाम दिसत असल्याचंही मारिन यांनी म्हटलंय. त्यांच्या म्हणण्यानुसार, व्यक्तीनं एका आठवड्यात केवळ २४ तास काम करायला हवं आणि जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबाला द्यायला हवा.
जॅक मा यांचंही असंच म्हणणं...
यापूर्वी चीनचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि 'अलिबाबा' कंपनीचे मालक जॅक मा यांनी २०१७ साली असंच म्हणणं मांडलं होतं. पुढच्या ३० वर्षांत लोक केवळ आठवड्यातील चार दिवसच काम करतील आणि तीन दिवस आराम करतील, असं भाकित जॅक मा यांनी वर्तवलं होतं. जगात आर्टिफिशिअल इन्टेलिजन्सचं काम वाढल्यानं व्यक्तींवरचा कामाचा ताण कमी होईल, असं त्यांनी म्हटलं होतं.
'मायक्रोसॉफ्ट'चा प्रयोग यशस्वी
काही दिवसांपूर्वी मायक्रोसॉफ्ट या कंपनीनंही आपल्या जपानच्या कार्यालयात केवळ चार दिवस काम हा प्रयोग करून पाहिला. काही दिवसांनंतर जे परिणाम आले ते केवळ आश्चर्यकारक होते. यामुळे, कंपनीचा नफा मोठ्या प्रमाणात वाढला होता.
पाच दिवस काम करणाऱ्या देशांत कमाईही जास्त
उल्लेखनीय म्हणजे, ज्या देशातील नागरिक आठवड्यात केवळ पाच दिवस काम करतात त्यांची सरासरी कमाईही जास्त आहे. अमेरिकेत सरासरी कमाई ४३,५९,०५९ रुपये, स्वीत्झरर्लंडमध्ये ४३,५६,८८५ रुपये आणि ऑस्ट्रेलियात ३७,७२,७४५ रुपये आहे.