Hindenburd Report on SEBI : भारताचं अर्थकारण गेल्या काही दिवसांपासून ढवळून निघालं आहे. सातत्यानं मागील काही वर्षांमध्ये सुरू असणाऱ्या घडामोडी आणि त्यानंतर या घडामोडींचे उमटणारे पडसाद पाहता भारतीय अर्थव्यवस्थेच्या वर्तुळात काही नावं प्रकर्षानं आणि अधिक ठळकपणे पुढे येत आहेत. यापैकी काहींच्या नावाला वादाची, तर काहींच्या नावाला चर्चेची आणि रोखलेल्या नजरांची किनार आहे. ही नावं किंबहुना यातील काही ठराविक नावं जाणीवपूर्वक प्रकाशझोतात आणण्यासाठीच्या कारणांपैकी आणि माध्यमांपैकी एक आहे 'हिंडनबर्ग रिसर्च' ही संस्था. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या (SEBI) माधवी पुरी बुच आणि धवल बुच यांच्या अडचणींमध्ये भर टाकणाऱ्या याच हिंडनबर्ग अहवालाच्या माध्यमातून भारतातील मोठे उद्योजक (Gautam Adani) गौतम अदानीसुद्धा अडचणीत आले होते. (Hindenberg Research) हिंडनबर्ग रिसर्च या संस्थेची, अमेरिकन रिसर्च कंपनीची सुरुवात 2017 मध्ये नेट अँडरसन नावाच्या अमेरिकी नागरिकानं केली होती. 


ही कंपनी आर्थिक व्यवहारांमध्ये आढळणाऱ्या अनियमितता, विश्लेषण, चुकीच्या पद्धतीनं सुरु राबवली जाणारी व्यावसायिक धोरणं, छुपे आर्थिक व्यवहार आणि फॉरेन्सिक फायनान्स रिसर्च अशा धर्तीवर काम करते. 


Hindenberg शब्दाचा नेमका अर्थ काय? 


प्रत्यक्षात Hindenberg हे जगातील सर्वात मोठं उडतं जहाज होतं. आश्चर्य वाटेल, पण हे जहाज खरंच उडायचं. अतिशय मोठं आणि आलिशान असं हे जहाज, ज्यामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना केबिन, डायनिंग हॉल या आणि अशा अनेक सुविधा होत्या. थोडक्यात ज्याप्रमाणे पाण्यावर तरंगणारं जहाज होतं, तसंच हे होतं हवेत तरंगणारं जहाज. 


ही एअरशिप जमिनीवर न उतरता फ्लाईंग बेसवर असणाऱ्या मोठ्या उंच खांबांवर उतरवली/ बांधली जायची. हळुहळू वेग कमी करत ही एअरशिप खांबांपर्यंत आणली जायची. 


हेसुद्धा वाचा : Gautam Adani : रुग्णवाहिका ड्रायव्हर ते इलॉन मस्कशी पंगा...अदानींची पोलखोल करणारे Nathan Anderson आहेत तरी कोण?


 


हिंडनबर्ग जहाजानं 1936 या वर्षी म्हणजेच अपघाताआधी युरोप ते अमेरिका अशा 10 फेऱ्या मारल्या होत्या. 3 मे 1937 रोजी हिंडनबर्ग फ्रँकफर्टहून निघालं होतं. 6 मे रोजी ते सकाळी अमेरिकेतील लेकहर्स्टला पोहोचणं अपेक्षित होतं. या जहाजातून 36 प्रवासी आणि 61 कर्मचारी प्रवास करत होते. 


हिंडनबर्गनं हवेतच तीन फेऱ्या मारून अखेर ते अपेक्षित ठिकाणी आलं. दरम्यान लँडिंगची प्रक्रिया सुरू असताना त्यात वायूगळती होतेय असं आढळलं. क्षणात या उडत्या जहाजानं पेट घेतला आणि आगीच्या मोठ्या ज्वाळांचे लोट येऊ लागले आणि क्षणात हिंडनबर्गचा स्फोट झाला. या भीषण अपघातामध्ये 36 जणांचा मृत्यू ओढावला. ज्यांनी पेटत्या एअरशिपमधून खाली उड्या मारल्या ते गंभीररित्या दुखापतग्रस्त झाल्याचं वृत्त समोर आलं. 


ही एक प्रकारची मानवनिर्मित आपत्ती किंवा संकट होती असं गणलं गेलं आणि तिथून मानवनिर्मित संकट नेमकं किती गंभीर रुप धारण करू शकतं याचीच प्रचिती संपूर्ण जगाला आली. हिंडनबर्ग रिसर्च ही कंपनी सध्या करत असलेलं काम पाहता, कंपनीकडूनही काही मानवनिर्मित संकटं आणि तत्सम परिस्थितीचा आढावा घेत व्यवहारांमध्ये आढळणाऱ्या अनियमिततांच्या बळावर सखोल अभ्यास करत लक्षवेधी अहवाल सादर केले जातात.