UAE नंतर या आखाती देशात निर्माण होणार भव्य हिंदू मंदिर; PM मोदींनीही दिल्या शुभेच्छा
युएईनंतर लवकरच आणखी एका आखाती देशामध्ये भव्य हिंदू मंदिर बनवण्याची तयारी सुरू आहे. याबाबत लवकरच बीएपीएसच्या एका प्रतिनिधी मंडळाने त्या देशाच्या पंतप्रधानांची भेट घेतली आहे
नवी दिल्ली : युएईनंतर लवकरच आणखी एका आखाती देशामध्ये भव्य हिंदू मंदिर बनवण्याची तयारी सुरू आहे. याबाबत लवकरच बीएपीएसच्या एका प्रतिनिधी मंडळाने त्या देशाच्या पंतप्रधानांची भेट घेतली आहे. मंदिरासाठी जमीन आधीच मिळाली असून आता मंदिराचे काम सुरू होणार आहे.
मागील काही दिवसांपूर्वी नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर आखाती देशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. भारताकडे अरब राष्ट्रांनी नाराजी नोंदवली होती. दरम्यान, भारतातही तणावाचे वातावरण होते. नंतर परिस्थिती सामान्य होत गेली. दरम्यान आखाती देशांमधून हिंदूंसाठी चांगली बातमी आली आहे. युएईनंतर आणखी एका आखाती देशात भव्य हिंदू मंदिराचे निर्माण होणार आहे. यासाठीची तयारी सुरू आहे.
बहरीन देशाचे क्राउन प्रिंस आणि पंतप्रधान सलमान बिन हमद अल खलीफा यांची ब्रह्मविहारीदास आणि बीएपीएस स्वामिनारायण संस्थेच्या प्रतिनिधी मंडळाशी भेट झाली. बहरीनमध्ये बीएपीएस स्वामीनाराण हिंदू मंदिरांचे निर्माण 1 फेब्रुवारीला बहरीन सरकारद्वारे भेट देण्यात आलेल्या जमिनीवर होणार आहे.
या बैठकीत भारतीय राजदूत पीयुष श्रीवास्तव उपस्थित होते. बैठकीचे नेतृत्व बीएपीएस मध्य पूर्व चे प्रमुख आणि आंतरराष्ट्रीय समन्वयक स्वामी ब्रह्मविहारीदास यांनी केले. प्रतिनिधी मंडळात स्वामी अक्षरितदास आणि BAPS बहरीनचे अध्यक्ष डॉ. प्रफुल्ल वैद्य सामिल होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश
या भेटीदरम्यान ब्रह्म विहारीदास यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेशही क्राउन प्रिंस यांना दिला, ज्यामध्ये मोदींनी या ऐतिहासिक क्षणाचे स्वागत केले आहे. त्यांनी BAPS चे जागतिक अध्यात्मिक नेते महंत स्वामी महाराज यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छाही क्राउन प्रिंस यांना दिल्या.