दुबई: दुबईत बुधवारी विऑन जागतिक परिषदेचे उद्घानट झाले. संयुक्त अरब अमिरातीचे (युएई) कॅबिनेट मंत्री शेख नहायन बिन मुबारक अल नहायन यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी शेख नहायन बिन मुबारक अल नहायन यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी म्हटले की, भारत आणि युएई यांच्यात चांगले व्यापारी संबंध निर्माण झाले आहेत. आगामी काळात प्रादेशिक आणि जागतिक सुरक्षेच्यादृष्टीने हे फायदेशीर आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्यादृष्टीने युएईच्या अर्थव्यवस्थेचा आणखी विकास होण्याची गरज आहे. कारण, युएईचे भौगोलिक स्थान पाहता हा प्रदेश आफ्रिका, आशिया आणि दक्षिण युरोपमधील बाजारपेठांशी जोडला गेलेला आहे. आमच्यादृष्टीने उच्चतम दर्जाची सुरक्षा आणि उच्च राहणीमान या दोन गोष्टींना विशेष प्राधान्य असल्याचेही शेख नहायन बिन मुबारक अल नहायन यांनी सांगितले. 


विऑन जागतिक परिषदेच्या माध्यमातून बुद्धिजीवी, शैक्षणिक तज्ज्ञ आणि राजकीय नेते दक्षिण आशियाच्या भविष्यासंदर्भात विचारमंथन करणार आहेत. यावेळी भारताचे  माजी लष्करप्रमुख जनरल बिक्रम सिंग, अमेरिकेतील पाकिस्तानचे माजी राजदूत हुसैन हक्कानी आदी लोक दहशतवाद, शांतता आणि विकासाच्या मु्द्द्यावर आपापली भूमिका मांडतील.