नवी दिल्ली : चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून हाहाकार माजवणाऱ्या कोरोना Corona COVID 19 व्हायरसची दहशत साऱ्या जगभरात पाहायला मिळत आहे. जिथे माणसांमध्ये कोरोनामुळे भीतीचं वातावरण आहे, तिथेच आता प्राण्यांमध्येही या विषाणूचा संसर्ग होत असल्याचं निरिक्षणात आढळलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हाँगकाँगमध्ये एका पाळी कुत्र्याला या व्हायरसची लागण झाल्याचं वृत्त एएनाय या वृत्तसंस्थेकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. एका ६०वर्षीय महिलेकडे असणाऱ्या पाळीव कुत्र्याला कोरोनाची लागण झाल्याचं म्हटलं जात आहे. प्राण्यांमध्ये या व्हायरसची लागण होण्याची ही पहिलीच घटना आहे. शिवाय माणसांच्या संपर्कात आल्यामुळे कुत्र्याला या व्हायरसची लागण झाल्यामुळे या घटनेने साऱ्या जगाचं लक्ष वेधलं आहे. 


संबंधित महिलेला कोरोनाची लागण झाली होती. ज्यानंतर तिच्याकडे असणाऱ्या कुत्र्यालाही या व्हायरसचा संसर्ग झाला. सध्याच्या घडीला या कुत्र्याला पशू वैद्यकिय केंद्रात उपचारांसाठी ठेवण्यात आल्याचं कळत आहे. 


ऍग्रिकल्चर फिशरी कजर्वेशनने दिलेल्या  माहितीनुसार, एका पोमेरनियन कुत्र्याची कोरोनाची चाचणी करण्यात आली. यावेळी त्याला कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं. या कुत्र्याला कोरोनाची लागण झाल्याचं लक्षात येताच आता हाँगकाँगमध्ये कुत्र्यांनाही वेगळं ठेवलं जाऊ लागलं आहे. शिवाय पोमेरनियन या प्रजातीच्या कुत्र्यांचीही तपासणी केली जात आहे. 



हाँगकाँगमध्ये सोमवारपर्यंत जवळपास १०० जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं लक्षात आलं होतं. ज्यामध्ये आता कुत्र्यालाही या व्हायरसची लागण झाल्यामुळे सर्वत्र तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. 


वाचा : कोरोना व्हायरस : दिल्लीत उपाययोजनांसाठी बैठकांचे सत्र


दरम्यान, जगभरात फोफावणारा कोरोना व्हायरस पाहता, आता पाळीव प्राणी असणाऱ्या अनेकांनीच सतर्क राहत स्वच्छतेचे निकष पाळण्याचं प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांकडून सांगण्यात आलं आहे. शिवाय प्राण्यांशी अत्यंत मर्यादित काळासाठी संपर्कात राहण्याचा इशाराही दिला आहे.