Economy : देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये अनेक गोष्टींचा समावेश असतो. विविध स्तरांवर, विविध प्रमाणात देशातील प्रत्येक लहानमोठा घटक या गोष्टींवर सातत्यानं परिणाम करत असतो. पण, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्यांमध्ये एका गायिकेला बरंच श्रेय दिलं जात आहे. ही गायिका कोण आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करण्यासारखं तिनं नेमकं काय केलंय माहितीये? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही गायिका आहे अमेरिकन पॉप सिंगर टेलर स्विफ्ट (Taylor Swift). प्रेक्षकांची तोबा गर्दी, अनेकांचा शिगेला पोहोचलेला उत्साह, मधूनच रंगमंचावर पडणारा प्रकाश आणि त्यातून या गर्दीलाही शांत करेल असा आवाज हे असंच चित्र तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला, कॉन्सर्टला पाहायला मिळतं. जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवलेली ही गायिका फक्त कलाक्षेत्रातच नव्हे, तर देशाच्या अर्थव्यवस्थेतही गाजतेय. म्हणूनच की काय तिच्या या परिणामाला 'स्विफ्टोनॉमिक्स' असंही म्हटलं जात आहे. (Taylor Swift Economy )


टेलर स्विफ्ट आणि अर्थव्यवस्थेचं कनेक्शन काय? 


अमेरिकेमध्ये जिथंजिथं या गायिकेच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं तिथंतिथं मोठ्या संख्येनं चाहत्यांची गर्दी होते. याचा थेट फायदा कार्यक्रमाच्या आयोजकांना होतो. शिवाय तिथं खाण्यापिण्याच्या गोष्टी विकणारे, प्रवासाच्या सुविधा पुरवणारे अशा अनेक क्षेत्रांनाही यामुळं फायदा मिळतो. फक्त अमेरिका नव्हे तर, इतरही पाश्चिमात्य राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेमध्ये टेलर स्विफ्टचं योगदान असतं. 


आश्चर्याची बाब म्हणजे कोरोना महामारीदरम्यान संपूर्ण जगात पर्यटन क्षेत्राला चाप बसला होता. पण, टेलर स्विफ्टच्या कार्यक्रमांमुळं इथंही सर्व पाश तोडले. दूरवरून अनेक चाहते तिच्या कार्यक्रमासाठी अमेरिकेत आले. परिणामी हॉटेल आणि पर्यटनाशी संबंधित इतरही सुविधांना यामुळं नफा झाला आणि या साऱ्याचं श्रेय अर्थातच टेलर स्विफ्टलाही गेलं. दिलखेच अदा, कमनीय बांधा आणि काळजाला हात घालणारा आवज अशाच अंदाजात सर्वांसमोर येणारी टेलर स्विफ्ट अदभूत आहे असंच जाणकारांचं म्हणणं. 


हेसुद्धा वाचा : सहज खरेदी केलेल्या भूखंडावर 'या' माणसानं स्वत:च बनवला विचित्र नावाचा एक नवा देश; जाणून घ्या त्यामागचं सत्य 


तिच्या एका कार्यक्रमातील पैशांचं गणित पाहिल्यास तुम्हीही थक्क व्हाल. 9 ऑगस्ट रोजी कॅलिफोर्नियामध्ये टेलर स्विफ्टच्या एका कॉन्सर्टमध्ये 54000 चाहते सहभागी झाले होते. त्यासाठी सरासरी $254 किमतीनं तिकीटांची विक्री झाली. या तिकीटांची रिसेल किंमत दहा हजार डॉलर्सच्याही घरात वाढली. ब्लूमबर्गच्या माहितीनुसार तिच्या प्रत्येक Eras Show नं साधारण 13 मिलियन डॉलर इतकी कमाई केली. टेलर स्विफ्टच्या शोसाठी प्रत्येक चाहत्यानं कपडे, हॉटेल, खाणंपिणं, प्रवास या साऱ्यासाठी सरासरी 1300 डॉलर इतका खर्च केला आणि देशाच्या अर्थव्यवस्थेलाच याचा फायदा झाला. एका कलाकाराचं हे यश देशाच्या अर्थव्यवस्थेला कशी बळकटी देतंय लक्षात आलं?