हनोई : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलेलं आहे. सुपर पॉवर असलेल्या अमेरिकेत तर कोरोनामुळे १ लाखांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. संकटाच्या या काळातही एका देशानं आपल्या नागरिकांना कोरोनापासून वाचवलं आहे. या देशात कोरोनामुळे आत्तापर्यंत एकही मृत्यू झालेला नाही. महत्त्वाचं म्हणजे या देशाच्या आरोग्य सुविधाही फारशा चांगल्या नाहीत, तरीही योग्य उपाययोजना करून इकडे कोरोनावर मात करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिएतनाम या देशाची लोकसंख्या ९७ मिलियन म्हणजेच ९.७ कोटी एवढी आहे. या देशात अजून एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. शनिवारपर्यंत व्हिएतनाममध्ये कोरोनाचे फक्त ३२८ रुग्ण आहेत. व्हिएतनाम या देशाची मोठी सीमा चीनला लागून आहे, तरीही त्यांनी कोरोनाला मात दिली आहे. 


व्हिएतनाम या देशाची आरोग्य यंत्रणाही विकसित देशांसारखी नाही. तसंच देशाचं उत्पन्नही निम्न-मध्य आहे. वर्ल्ड बँकेच्या माहितीनुसार व्हिएतनाममध्ये प्रत्येक १० हजार लोकांमागे एक डॉक्टर आहे. 


व्हिएतनामचा लॉकडाऊन


व्हिएतनामने ३ आठवड्यांच्या लॉकडाऊननंतर एप्रिलच्या शेवटी सोशल डिस्टन्सिंगचे नियमही हटवले. ४० दिवसात व्हिएतनाममध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. यामुळे देशात उद्योग आणि शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत, त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येऊ लागलं आहे. 


व्हिएतनामने कोरोनाचा पहिला रुग्ण मिळण्याच्या काही आठवड्यांआधीच तयारीला सुरूवात केली होती. ज्यावेळी चीनचे अधिकारी आणि WHO कोरोनाचा संसर्ग माणसातून माणसाला होतो का नाही, याबाबत स्पष्ट पुरावे नाहीत, असं सांगत होतं, पण व्हिएतनाम कोणताही धोका पत्करायला तयार नव्हतं. 


'आम्ही फक्त WHOच्या मार्गदर्शक तत्त्व आणि सूचनांची प्रतीक्षा करत नव्हतो. आम्ही देशांतर्गत आणि देशाच्या बाहेरून डेटा गोळा केला आणि यावर जलद कारवाई करण्याचा निर्णय घेतला', असं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फेक्शन कंट्रोल डिपार्टमेंटचे उपप्रमुख फाम क्वांग थाय यांनी सांगितलं.


वुहानमधून आलेल्यांची तपासणी


जानेवारीच्या सुरुवातीलाच हनोईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर वुहानमधून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात होती. ज्या प्रवाशांना ताप आल्याचं आढळलं त्यांना वेगळं ठेवण्यात आलं. जानेवारीच्या मध्यात उपपंतप्रधान वु डक डॅम यांनी कोरोनाला रोखण्यासाठी सरकारी यंत्रणांना कठोर पावलं उचलण्याचे आदेश दिले. 


व्हिएतनामने त्यांच्या नव्या वर्षाचं स्वागत केल्यानंतर लगेचच पंतप्रधान गुयेन जुआन फुक यांनी कोरोनाविरुद्ध लढण्याची घोषणा केली. कोरोनाशी लढणं म्हणजे शत्रूशी लढण्यासारखं आहे, असं पंतप्रधान २७ जानेवारीला झालेल्या कम्यूनिस्ट पार्टीच्या बैठकीत म्हणाले. तीन दिवसांमध्येच त्यांनी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राष्ट्रीय संचालन समितीची स्थापना केली. त्याचदिवशी WHOने कोरोना व्हायररस ही जागतिक आणीबाणी असल्याचं घोषित केलं. 


१ फेब्रुवारीला जेव्हा व्हिएतनाममध्ये कोरोनाचे ६ रुग्ण आढळले, तेव्हा व्हिएतनाम आणि चीनमधल्या सगळ्या विमानसेवा थांबवण्यात आल्या. यानंतर दुसऱ्याच दिवशी चीनच्या नागरिकांचा व्हिसाही रद्द करण्यात आला. मार्चच्या शेवटी व्हिएतनामने सगळ्या परदेशी नागरिकांना प्रवेशबंदी केली.