वॉशिंग्टन : जगातल्या सर्वात वेगवान अर्थव्यवस्थेचं बिरुद भारत यंदाही टिकवणार असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं (IMF) म्हटलंय. भारतात चालू आर्थिक वर्षात विकासाचा ७.३% तर पुढील आर्थिक वर्षात विकासदर ७.५% राहील, असा अंदाज वर्तवलाय. त्याचप्रमाणे गेल्या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर चीनच्या तुलनेत जवळपास अर्धा टक्का अधिक राहिल्याचंही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलंय. येत्या काळात भारताच्या आर्थिक विकासाचा दर वेगवान राहण्यामागे खासगी आणि सरकारी क्षेत्रातून झालेली मोठ्या प्रमाणातील गुंतवणूक तसंच अर्थव्यवस्थेत सातत्यानं टिकून असलेली दमदार मागणी अशी दोन प्रमुख कारणे आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढची तीन ते पाच वर्षात भारतीय अर्थव्यवस्था सरासरी ७ टक्के दरानं विकासाच्या मार्गावर टिकून राहील, असं भाकितही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं वर्तवलंय. दरम्यान, सरकारवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी आर्थिक क्षेत्रातील पायभूत धोरण बदलांचा सिलसिला कायम राखणं भारतासाठी आवश्यक असल्याचंही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वार्षिक अहवालात नमूद करण्यात आलंय.


गुंतवणुकीत सुधार आणि उपभोग वाढण्यानं भारत जगातील सर्वात वेगानं प्रगती करणीर प्रमुख अर्थव्यवस्था बनेल, असं मत आयएमएफनं नोंदवलंय. २०१८ सालात भारताचा विकास दर ७.१ टक्क्यांवर असताना चीनचा विकास दर मात्र ६.६ टक्क्यांवर होता. आयएमएफच्या अंदाजानुसार, २०१९ मध्ये चीनचा विकास दर ६.३ टक्के आणि २०२० मध्ये ६.१ टक्के राहण्याची शक्यता आहे. तर भारताचा विकास दर २०१९ मध्ये ७.३ टक्क्यांवर आणि २०२० पर्यंत हा दर ७.५ टक्क्यांवर पोहचण्याची शक्यता आयएमएफनं व्यक्त केलीय.