Imran Khan Arrest: अटक होण्याआधीच इम्रान खान फरार? पोलिसांनी दिली माहिती
Imran Khan Arrest: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना अटक करण्यासाठी पोलीस अटक वॉरंट (Arrest Warrant) घेऊन घरी दाखल झाले होते. 28 फेब्रुवारीला वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये झालेल्या सुनावणीत कोर्टाने त्यांना दिलासा दिला होता. मात्र तोशखाना प्रकरणी कोर्टाने जामीन नाकारल्याने त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
Imran Khan Arrest: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या अटकेसाठी पोलीस (Police) घरी पोहोचले होते. मात्र पोलिसांना मोकळ्या हाती परतावं लागलं आहे. पोलीस अटक वॉरंट (Arrest Warrant) घेऊन इम्रान खान यांच्या घरी पोहोचले असता ते घऱीच नव्हते. कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर इम्रान खान यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. इस्लामाबादच्या पोलीस महासंचालकांनी इम्रान खान यांच्या अटकेचे आदेश दिले आहेत. दरम्यान, इम्रान खान यांच्या अटकेची शक्यता सध्या मावळली आहे. यासंबंधी कोर्टातही माहिती दिली जाणार आहे.
इम्रान खान यांना अटक करण्यासाठी पोलीस त्यांच्या जमन पार्क (Zaman Park) येथील घरी दाखल झाले होते. पोलीस इम्रान खान यांना अटक करणार असल्याची माहिती मिळताच पीटीआय (PTI) पक्षाचे कार्यकर्ते घराबाहेर जमले होते. यादरम्यान पोलिसांसह त्यांची धक्काबुक्की झाल्याने काही वेळासाठी गोंधळाचं वातावरण झालं होतं.
तोशखाना (Toshkhana) प्रकरणी पोलीस इम्रान खान यांना अटक करण्यासाठी दाखल झाले होते. मात्र पोलिसांनी घराची झडती घेतली असता ते घरात सापडले नाही. पोलीस आता कोर्टाच्या आदेशानुसार पुढील कारवाई करणार आहे. कोर्टाने पोलिसांना 7 मार्चपर्यंत इम्रान खान यांना हजर करण्याचा आदेश दिला आहे.
दुसरीकडे पीटीआय पक्षाचे फवाद चौधरी यांनी अटकेचा प्रयत्न बेकायदेशीर असल्याचा आरोप केला आहे. कोर्टाने जारी केलेला वॉरंट हा कोर्टात उपस्थित राहण्यासंबंधी होता असा त्यांचा दावा आहे. "इम्रान खान यांना अटक करण्याचा कोणताही प्रयत्न झाला तर गंभीर स्थिती निर्माण होईल. पाकिस्तानविरोधी सरकारला मी चेतावणी देत आहे की, पाकिस्तानला अजून संकटात टाकू नका आणि समजूतदारपणे काम करा," असं फवाद चौधरी म्हणाले आहेत.
इम्रान खान यांच्याविरोधात वेगवेगळ्या प्रकरणी कोर्टांमध्ये सुनावणी सुरु आहेत. यामध्ये तोशखाना, दहशतवाद, हत्येचा प्रयत्न, प्रतिबंधित संस्थांकडून निधी मिळवणे अशा प्रकरणांचा समावेश आहे. कोर्टाने इम्रान खान यांना तीन प्रकरणात दिलासा दिला होता. पण तोशखाना प्रकरणी अटक वॉरंट जारी केला.
तोशखाना प्रकरण नेमकं काय आहे?
तोशखाना हे पाकिस्तान सरकारमधील एका शासकीय विभागाचं नाव आहे. संविधानिक पदावर असताना मिळालेल्या भेटवस्तू संबंधितांना या विभागात जमा करायच्या असतात. इम्रान खान पंतप्रधानपदी असताना त्यांना अनेक मौल्यवान गोष्टी भेटवस्तू म्हणून मिळालेल्या होत्या. पण त्यांनी त्या तोशखानात जमा न करता त्या विकून पैसे मिळवल्याचा आरोप आहे.