पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खान यांच्याकडून लादेनचा `शहीद` असा उल्लेख
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून ओसामा बिन लादेनचा उल्लेख शहीद असा करण्यात आला आहे.
इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून ओसामा बिन लादेनचा उल्लेख शहीद असा करण्यात आला आहे. इम्रान खान यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर फक्त जगभरातूनच नाही, तर पाकिस्तानमधूनही टीका होत आहे. अमेरिकेने पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये येऊन लादेनला शहीद केल्याचं इम्रान खान म्हणाले. शहीद म्हणल्यानंतर लगेचच इम्रान खान यांनी त्यांची चूक सुधारली आणि लादेनला मारण्यात आलं, असं ते म्हणाले.
'आम्ही अमेरिकेला मदत केली आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईत त्यांची साथ दिली. हे करत असताना पाकिस्तानचीच नाचक्की झाली. दहशतावादविरुद्धच्या लढाईत आम्ही सहभागी होत असताना आम्हालाच अपमानित करण्यात आलं. अमेरिकेला अफगाणिस्तानमध्ये अपयश आलं, तरी त्याचं खापर पाकिस्तानवर फोडण्यात आलं. दोन घटनांमुळे पाकिस्तानची नाचक्की झाली. पहिले अमेरिका अबोटाबादमध्ये आली आणि त्यांनी ओसामा बिन लादेनला शहीद केलं, त्याला मारलं. यानंतर काय झालं? संपूर्ण जगाने आमच्यावर टीका केली. आपलीच सहकारी असलेली अमेरिका आपल्याच देशात आली आणि आम्हाला न सांगता एकाला मारून गेली. हा सगळ्यात मोठा अपमान होता. ७० हजारांपेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिकांचा अमेरिकेच्या युद्धामध्ये मृत्यू झाला आहे,' असं इम्रान खान पाकिस्तानच्या संसदेत बोलले.
इम्रान खानना लादेनचा पुळका
इम्रान खान यांना ओसामा बिन लादेनचा पुळका येण्याची ही काही पहिली वेळ नाही. पंतप्रधान व्हायच्या आधी दिलेल्या मुलाखतीमध्ये इम्रान खान यांनी लादेनला दहशतवादी म्हणायला नकार दिला होता. एवढच नाही तर त्यांनी लादेनची तुलना अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्यासोबत केली होती. जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिटीशांसाठी दहशतवादी असले, तरी इतरांसाठी स्वातंत्र्य सैनिक होते, असं इम्रान खान म्हणाले होते.
मागच्या सप्टेंबर महिन्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या इम्रान खान यांनी लादेनच्या मुद्द्यावर भाष्य केलं होतं. ओसामा बिन लादेन अबोटाबादमध्ये असल्याचं पाकिस्तानने अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांना कळवलं होतं. अमेरिकेने पाकिस्तानला अंधारात ठेवून हे ऑपरेशन करायची गरज नव्हती, अशी प्रतिक्रिया इम्रान खान यांनी दिली होती.
पाकिस्तान अमेरिकेचा सहकारी आहे, पण लादेनवरची कारवाई केल्यानंतर पाकिस्तानला लाजिरवाणं झाल्याचं इम्रान खान यांनी अमेरिकेतल्या वृत्तवाहिन्यांना सांगितलं होतं.