वेलिंग्टन: न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च शहरातील मशिदीत अंदाधुंद गोळीबार करून ४९ जणांचे बळी घेणाऱ्या हल्लेखोराने आपल्या कृतीमागील कारण स्पष्ट केले आहे. ओल्ड ब्रेन्टन असे या हल्लेखोराचे नाव असून त्याने न्यूझीलंडच्या भूमीवरून भारत आणि पूर्वेकडच्या देशांतील लोकांचे उच्चाटन केले पाहिजे, असे म्हटले आहे. हल्ल्यानंतरच्या तपासादरम्यान पोलिसांना ऑनलाईन आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेला ओल्ड ब्रॅन्टनचा ७४ पानी जाहीरनामा मिळाला. द ग्रेट रिप्लेसमेंट असे शीर्षक असणाऱ्या या जाहीरनाम्यात ब्रेन्टनने सर्व घुसखोरांना युरोपच्या भूमीवरून पिटाळून लावले पाहिजे, असे म्हटले आहे. मग ते रोमा, भारतीय, सेमिटीक किंवा तुर्कीश वंशाचे लोक असोत. ते आपले लोक नसतील तर त्यांना आपल्या भूमीवरून हाकललेच पाहिजे, असे ब्रॅन्टनने या जाहीरनाम्यात म्हटले आहे. ब्रेन्टनने हा जाहीरनामा क्लाऊड, सोशल मीडिया आणि काही ऑनलाईन माध्यमांवर प्रकाशित केला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रॅन्टनने जाहीरनाम्यात म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला न्यूझीलंडमध्ये हल्ला करण्याचा माझा विचार नव्हता. मी फक्त काही काळ राहण्यासाठी येथे आलो होतो. मात्र, या काळात एक गोष्ट माझ्या लक्षात आली की, पश्चिमेकडील कोणत्याही देशाच्या तुलनेत न्यूझीलंड हे हल्ल्यासाठी योग्य ठिकाण आहे. यामुळे येथील नागरी संस्कृतीवर होणाऱ्या अतिक्रमणाकडे इतरांचे लक्ष वेधले जाईल, ब्रॅन्टनने म्हटले आहे.


टॅरॅन्टने शुक्रवारी अल नूर आणि लिनवुड अवे या दोन मशिदींमध्ये केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ४९ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात दोन भारतीय जखमी झाले असून नऊ जण बेपत्ता आहेत. या हल्ल्यातून बांगलादेशचा क्रिकेट संघही थोडक्यात बचावला होता. प्रार्थनेसाठी मशिदीत गर्दी जमली असताना त्याने अंदाधुंद गोळीबार केला. त्यामुळे मोठ्याप्रमाणावर जीवितहानी झाली. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिगा आर्डर्न यांनी या घटनेचा निषेध करताना ओल्ड ब्रॅन्टन हा दहशतवादी असल्याचा उल्लेख केला. या हल्ल्यानंतर पोलिसांनी टॅरॅन्टला ताब्यात घेतले होते. आज त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर ५ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावण्यात आली.