पूर्व लडाख : भारत - चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा गोळीबार
पूर्व लडाखमध्ये पँगाँग लेक परिसरात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा गोळीबार झाला आहे.
नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये पँगाँग लेक परिसरात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा गोळीबार झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. चीनकडून सातत्याने खुरापती काढण्यात येत आहेत. ७ आणि ८ सप्टेंबरला १०० ते २०० फैरी झाडण्यात आल्या आहेत. फिंगर ३ आणि फिंगर ४ क्षेत्रात रेजलाईनवर हा गोळीबार झाला.
१० सप्टेंबरला मॉस्कोत भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीपूर्वी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गोळीबार झाल्याचे समजते आहे. पँगाँग लेकच्या दक्षिण आणि उत्तर किनाऱ्यांवर भारताने प्रचंड प्रमाणात कुमक वाढवली आहे. या भागातल्या भारतीय चौक्यांवर चीनने अनेकदा घुसखोरीचा प्रयत्न केला.
७ आणि ८ सप्टेंबरला शेनपॉव डोंगर रांगात अशाच एका प्रयत्नात भारतीय लष्कराला चिनी सैनिकांना रोखण्यासाठी हवेत गोळीबार करावा लागला अशी माहिती समोर येतेय. भारताने ही वॉर्निंग फायरिंग केली होती, असे समजते आहे. या फायरिंगसाठी एलएमजी आणि असॉल्ट रायफलींचा वापर झाल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान झालेल्या घुसखोरीवेळी पँगाँगच्या दक्षिण किनाऱ्यावर गोळीबार झाला होता.