`कर्तारपूर कॉरिडॉर` उघडणार भारत - पाकिस्तानसाठी संवादाचे दरवाजे
इम्रान खान यांनी, `शांततेचं पाऊल` म्हणून भारतीय वैमानिकाला शुक्रवारी भारताकडे सोपवण्याची घोषणा केली होती
नवी दिल्ली : भारत पाकिस्तान युद्धाचे ढग हटल्याचे संकेत मिळालेत. कर्तारपूर कॉरिडॉरबाबत दोन्ही देशांच्या प्रतिनिधी मंडळात चर्चा ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार, असं भारताच्या वतीने स्पष्ट करण्यात आलंय. 'विऑन' या आमच्या सहकारी वाहिनीला भारतीय अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलीय. हा एका समाजाच्या भावनेचा प्रश्न असल्याने आम्ही पाकिस्तानी अधिकाऱ्यांचं चर्चेसाठी स्वागत करतो असं 'विऑन'शी बोलताना सांगण्यात आलं. १४ मार्चला याबाबतच्या चर्चेची पुढची फेरी होणार आहे. भारताने कर्तारपूर इथे जाण्यासाठी याआधीच मार्ग सुचवला आहे. मात्र पाकिस्तानने सुचवलेला मार्ग दुसरा आहे.
दरम्यान, थोड्याच वेळात अटारी-वाघा बॉर्डरवर पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन आज भारतात परतणार आहेत. अटारी - वाघा बॉर्डरवर. बुधवारी पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्यूत्तर देताना अभिनंदनचं 'मिग २१' हे विमान अपघातग्रस्त झालं होतं. परंतु, यावेळी अभिनंदन भारताच्या भारताची हद्द ओलांडून पाकिस्तानात जमिनीवर खाली कोसळला. त्यानंतर पाकिस्तान सेनेनं त्याला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर गुरुवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी, 'शांततेचं पाऊल' म्हणून भारतीय वैमानिकाला शुक्रवारी भारताकडे सोपवण्याची घोषणा केली होती.