आता बस्स झालं...कावेबाज चीनला भारताचा कडक इशारा, पाहा अशी केलेय तयारी
गेल्या वर्षभरात चीनला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी भारताने केली आहे.
मुंबई : चीनच्या (China) गलवान खो-यातल्या (Galvan Valley) हल्ल्याला आज एक वर्षं पूर्ण झाले आहे. चीनचा हा भ्याड हल्ला भारत (India) विसरलेला नाही, विसरणार नाही. जे 20 सैनिक शहीद झाले. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. गेल्या वर्षभरात चीनला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी भारताने केली आहे. पाहुया सध्या लडाखमध्ये काय सुरू आहे. (India's warning to China)
आता बस्स झालं...
15 जून 2020. इतिहास कधीच हा दिवस विसरणार नाही. गेल्या वर्षी याच दिवशी भारत-चीनचे सैनिक गलवान खो-यात भिडले होते. शूरवीर भारतीय जवानांनी चीनी सैनिकांना हुसकावून लावलं... जोरदार धुमष्चक्री झाली. चीनचे अनेक जवान मारले गेले. तर भारताच्या वीस सुपुत्रांना वीरमरण आलं. त्या दिवसापासून आजपर्यंत चीन कुरापती करतच राहिला आहे. गलवान युद्धानंतर चीनला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी भारताने केली आहे.
भारताची अशी तयारी
लडाखमध्ये आपले 60 हजार सैनिक तैनात आहेत. या सैनिकांकडे अत्याधुनिक शस्त्र आहेत. ड्रोन, सेंसर, आणि अत्याधुनिक विमाने LAC वर सतत नजर ठेवून आहेत. DRDO ची स्पेशल सर्वेलन्स सिस्टीम तैनात करण्याची योजना आहे. या भागात रस्त्यांची कामे जोरात सुरू आहेत. सध्या या भागात 32 रस्ते बांधले जात आहेत. पॅगाँग तलावात नौका तैनात आहेत. राफेल, चिनूक, अपाचे ही लढाऊ विमानंही सज्ज आहेत.
चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज
गलवान हल्ल्यानंतर भारतीय सेनेनं लडाखमध्ये लक्ष केंद्रित केले आहे. लडाखमधल्या उणे 40 अंश तापमानात भारतीय लष्कर चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहे. आता जर चीनने पुन्हा हल्ला केलाच तर त्याची मोठी किंमत चीनला चुकवावी लागणार यात शंका नाही.