भारतामधील एक बाप आणि मुलगा घर सोडून पाकिस्तानात पळून गेले आहेत. पाकिस्तानात पोहोचल्यानंतर त्यांनी भारतावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. भारतामध्ये आपल्यावर कथितपणे धार्मिक अत्याचार केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दोघांनी अनधिकृत मार्गाने देशात प्रवेश केला असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. अफगाणिस्तानच्या सीमारेषेवरुन दोघेही भारत सोडून पळून गेले होते. या बाप-लेकांचं दिल्लीत घर आहे. सध्या या दोघांची चौकशी केली जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 70 वर्षीय मोहम्मद हसनैन आणि त्यांचा 31 वर्षीय मुलगा इशाक अमीर याने पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमारेषेवरुन अनधिकृतपणे पाकिस्तानात प्रवेश केला आहे. दोघांनी जवळपास 14 दिवसांपूर्वी बलुचिस्तान प्रांतातील चमनमध्ये प्रवेश केला होता. दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या ते कराचमधील एका वेलफेअर ट्रस्टमध्ये आश्रयास आहेत. 


'वैतागून भारत सोडण्याचा निर्णय'


मोहम्मद हसनैन यांनी सांगितलं आहे की, जर पाकिस्तानी अधिकारी आम्हाला जेलमध्ये टाकू इच्छित असतील तर आम्ही त्यासाठी तयार आहोत. आम्ही कोणत्याही कायदेशीर कागदपत्रांसह येथे आलो आहोत. आम्हाला पाकिस्तानात आश्रय घ्यायचा आहे. हसनैन आणि आमीरचं म्हणणं आहे की, ते नवी दिल्लीच्या गौतमपुरी येथील रहिवासी आहेत. तिथे त्यांचं घर आहे. त्यांनी आरोप केला आहे की, गेल्या अनेक काळापासून त्यांचा छळ आणि धार्मिक शोषण केलं जात आहे. यामुळे वैतागून आपण देश सोडून पाकिस्तानात येण्याचा निर्णय घेतला. 


'काबूल ते कंधार, नंतर पाकिस्तानात प्रवेश'


हसनैन यांनी सांगितलं आहे की, आपल्याला कराची पोहोचण्यासाठी 14 दिवस लागले. जिथे सर्वात आधी ते पोलीस ठाण्यात गेले आणि आत्मसमर्पण केलं. दोघेही 5 सप्टेंबरला नवी दिल्लीहून दुबईसाठी रवाना झाले होते. तिथे त्याने अफगाणिस्तानच्या दुतावासामधून व्हिसा मिळाला. त्यांनी सांगितलं आहे की, आम्हाला व्हिसा मिळाला आणि आम्ही काबूलसाठी रवाना झालो. तिथे आम्ही रस्तेमार्गे कंधारला गेलो आणि तिथून आम्ही चमन येथेून पाकिस्तानात दाखल झालो. 


दोन्ही बाप-लेकांनी अफगाणिस्तान एंजटच्या सहाय्याने सीमारेषा पार केला. यानंतर त्याने कराचीला जाण्यासाठी चालकाला 60 हजार रुपये दिले. कराचीचे पोलीस उपनिरीक्षक असद रजा यांनी सांगितलं आहे की, दोघे गुप्तहेर असल्याचा संशय नाही. पण ते धार्मिक छळाचे पीडित असल्याचं मानलं जात आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने अद्याप यावर काही टिप्पणी केलेली नाही. 


Dawn च्या रिपोर्टनुसार, हसनैन यांनी सांगितलं आहे की, भारतात मुस्लीम व्यक्ती एखाद्या गोष्टीचा विरोध करताना पकडला गेल्यास अनधिकृत असल्याचं सांगत त्याच्या घऱावर बुलडोझर चालवला जातो. मी हा देश सोडणारा पहिला व्यक्ती नाही. याआधीही अनेकांनी असं केलं आहे. पण ते श्रीमंत असल्याने अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, कॅनडा येथील नागरिकता मिळवण्यात यशस्वी ठरले. माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते.