अमेरिकेत भारतीय कुटुंब मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. हे कुटुंब मूळचं केरळचं असून घरात पती-पत्नीसह दोन्ही जुळ्या मुलांचे मृतदेह आढळले होते. हे कुटुंब सॅन मॅटेओ शहरात वास्तव्यास होतं. पोलिसांना सुरुवातीपासूनच हे हत्या-आत्महत्या प्रकरण असल्याचं वाटत होतं. दरम्यान, तपासादरम्यान पोलिसांनी पती आनंद सुजीत हेन्री हाच मुख्य संशयित असल्याचं सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांना आनंद सुजीत हेन्री (42), त्यांची पत्नी अॅलिस प्रियांका बेंजिगर (40) आणि त्यांच्या 4 वर्षाच्या जुळ्या मुलांचे मृतदेह सापडले होते. पोलीस जेव्हा घरी पोहोचले तेव्हा पती आणि पत्नीचा मृतदेह बाथरुममध्ये होता. त्यांच्या शरिरावर बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा होत्या. त्यांच्या मृतदेहाशेजारी 9mm ची पिस्तूल आणि भरलेली मॅगजिन होती. दोन्ही जुळ्या मुलांचे मृतदेह बेडरुममध्ये होते. 


मुलांचा मृत्यू नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, पण त्यांना गुदमरुन किंवा गळा दाबून अथवा विष देऊन मारुन टाकलं असावं अशी शंका आहे. कारण त्यांच्या शरिरावर कोणतीही जखम किंवा खूण आढळलेली नाही. 


पोलिसांनी याप्रकरणी निवेदन जारी केलं आहे. त्यात देण्यात आलेल्या माहितीनुसार, "आम्ही तपास केला असता अॅलिस प्रियांका बेंजिगरच्या शरिरावर एकापेक्षा जास्त गोळ्या चालवण्यात आल्या आहेत. पण आनंदला एकच गोळी लागली आहे. मुलांवर गोळी चालवण्यात आलेली नाही. त्यांना नेमकं कशाप्रकारे ठार केलं हे अद्याप समजलेलं नाही". पोलिसांनी आनंदच चारही मृत्यूला कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. आनंदने आधी पत्नी आणि मुलांना ठार केलं आणि नंतर आत्महत्या केली असा पोलिसांचा दावा आहे. 


दरम्यान लिंक्डइन प्रोपाईलमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, आनंद मेटामध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. त्याआधी गुगलमध्येही त्याने नोकरी केली. मेटाने दरम्यान या घटनेवर काहीही भाष्य केलेलं नाही. प्रोफाईलनुसार, जेव्हा तो नोकरीवर होता तेव्हा आर्टिफिशिअल इंटेलिजन्समध्ये काम करत होता. तर प्रियांका झिल्लो कंपनीत डेटा सायन्टिस्ट होती. 


पोलिसांनी घरातून हिंसाचाराची याआधी कोणतीही घटना समोर आली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. याआधी एकदा त्यांच्या घरामागे सिंह दिसला तेव्हाच पोलीस आले होते अशी माहिती त्यांनी दिली. 


कोर्टात मिळालेल्या नोंदीनुसार, आनंदने डिसेंबर 2016 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. पण प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती. घटनास्थळी पोलिसांनी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. कुटुंब काहीच प्रतिसाद देत नसल्याची तक्रार मिळाल्यानंतर पोलीस तपासणीसाठी आले असता ही घटना उघडकीस आली.