रेल्वे गोंधळली आणि जगाला मिळाली योग्य `वेळ`; गोष्ट अशा गावाची जिथून चालतं संपूर्ण जगाचं घड्याळ
World News : संपूर्ण जगात एकाच क्षणी घड्याळाची वेळ वेगवेगळी असते. असं नेमकं का? जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. जगाच्या पाठीवर किती काय सुरु असतं पाहून व्हाल हैराण...
World News : 'आमचं जगणं म्हणजे घड्याळाच्या काट्यावर सुरु असणारी एक शर्यतच आहे..' असं म्हणणारे अनेकजण तुम्ही पाहिले असतील. घड्याळ... हातावर बांधलेलं असो किंवा मग भींतीवर लावलेलं असो. वेळ दाखवणं इतकंच त्याचं काम. असं हे घड्याळ या न त्या रुपात आपल्याला क्षणाक्षणाला वेळ निसटतेय असं सांगत भानावर आणत असतं. वर्तमानात मिळालेला प्रत्येक क्षण मनसोक्त जगण्याचा संदेश देत असतं. जगाच्या पाठीवर आज असा एकही देश नाही, जिथं घड्याळाचा वापर केला जात नाही. याच घड्याळाच्या इतिहासात डोकावायचं झाल्यास थेट 16 व्या शतकात जावं लागेल.
घड्याळाचा इतिहास...
16 व्या शतकाच्या सुमारास घड्याळाचा प्रवास सुरु झाला आणि 18 व्या शतकापर्यंत जगभरात सूर्याच्या आधारे घड्याळाची वेळ ठरवली जात होती. 18 व्या शतकात युरोपात झालेल्या औद्योगिक क्रांतीनं संपूर्ण जगाला टाईमझोन मिळालं. 19 व्या शतकाच्या सुरुवातीला सूर्यानुसार स्थानिक वेळ ठरवली जात होती. ज्यावेळी सूर्य डोक्यावर असायचा तेव्हा ती दुपार असायची, दर दोनशे मैलांवर असणाऱ्या शहरांमध्ये ही वेळ बदलत जात होती. पण, रेल्वेच्या वेळा आणि इतर कामांमध्ये मात्र यामुळं मोठ्या अडचणी आल्या.
हेसुद्धा वाचा : 'या' देशांमध्ये बाळाच्या जन्मानंतर आईला मिळते वर्षभराची प्रसूतरजा
ब्रिटनमध्ये औद्योगिक क्रांतीमागोमागच 1830 मध्ये लिवरपूल आणि मॅचेस्टरदरम्यान रेल्वेसेवा सुरु झाली. ज्यानंतर दहा वर्षांनी रेल्वेचं पहिलं वेळापत्रक तयर करण्यात आलं. रेल्वे जिथं जिथं जात होती तिथंतिथं वेळेचा मात्र गोंधळ होत होता. अखेर 1847 मध्ये ब्रिटीश रेल्वे कंपन्यांनी परस्पर सामंजस्यानं लिवरपूल, मँचेस्टर किंवा ग्लासगोवऐवजी ग्रीनविच वेधशाळेतून देण्यात आलेला वेळ ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला गेला. 1980 मध्ये इंग्रज सरकारनं हा नियमच केला आणि जगाला मिळाला ग्रीनविच मिन टाइम म्हणजेच GMT.
कुठे आहे हे ठिकाण?
दक्षिण पूर्व लंडनमधील हे एक ठिकाण, अर्था ग्रीनविच. कधीकाळचं हे खेडं तिथं असणाऱ्या वेधशाळेमुळं चर्चेत आलं. आता हेच ठिकाण 'रॉयल ऑब्जर्वेटरी' म्हणूनही प्रसिद्ध आहे. कैक वर्षांपासून इथं अनेक खगोलीय घटना घडल्याचं पाहायला मिळालं आहे. ज्यावेळी ब्रिटननं या ठिकाणालाच टाईमझोन मानलं, तेव्हा त्याला जगाच्या नकाशाचं केंद्रसुद्धा मानलं गेलं. ही संपूर्ण प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत राहून करण्यात आली.
जगात अशा किती टाईमझोन आहेत?
सध्याच्या घडीला जगात एकूण 24 टाईमझोन आहेत. प्रत्येक देश राजकीय आणि भौगोलिक घटकांच्या आधारे टाईमझोन निश्चित करतो. फ्रान्समध्ये सर्वाधिक म्हणजेच 12, रशियामध्ये 11, अमेरिकेमध्ये 9 आणि अंटार्क्टिकामध्ये 10 टाईमझोन आहेत. ब्रिटनमध्ये 9, ऑस्ट्रेलियामध्ये 8 तर, डेन्मार्कमध्ये 5 टाईमझोन आहेत. भारत मात्र इथं अपवाद असून, देशात फक्त एकच टाईमझोन आहे.