आंतराष्ट्रीय बातम्या । लडाख : डेमचोक सेक्टरमध्ये एका चीनी सैनिकाला पकडले
भारतीय सैन्याने लाडाखच्या डेमचोक सेक्टरमध्ये एका चीनी सैनिकाला पकडले.
नवी दिल्ली : भारतीय सैन्याने लाडाखच्या डेमचोक सेक्टरमध्ये एका चीनी सैनिकाला पकडले आहे. रस्ता चुकल्याने हा सैनिक भारतीय सीमेत आल्याची माहिती भारतीय जवानांनी दिली आहे. या भागातील अतीउंचीवरच्या खडतर वातावरणापासूनच्या रक्षणासाठी, त्याला वैद्यकीय मदत पुरवल्याचं भारतीय लष्करानं सांगितले. सैनिकी प्रोटोकॉलनुसार त्याला पुन्हा चीनच्या हद्दीत पाठवले जाणार आहे.
'हा' भूभाग चीनचा दाखविण्याच प्रयत्न
चीन सरकारसोबत चायनीज मोबाईल कंपन्याही अतिहुशारी दाखवू लागल्यात. शाओमी या चायनीज मोबाईल कंपनीने आपल्या अॅपमध्ये लेह-लडाख हा भूभाग चीनचा असल्याचं दाखवला आहे. इतकच नाही तर अरुणाचल प्रदेशही भारताच्या नकाशातून काढून चीनमध्ये दाखवण्यात आलाय. दरम्यान ही अॅपमधील तांत्रिक चूक असल्याची कबुली शाओमी कंपनीनं दिलीये.
पावसामुळे सैन्याच्या छावणीवर भूस्खलन
व्हिएतनाममध्ये मुसळधार पावसामुळे सैन्याच्या छावणीवर भूस्खलन झालं होते. अख्ख्याच्या अख्ख्या जमीनीचा ढिगारा सैन्याच्या छावणीवर पडला आणि १०० पेक्षा जास्त सैनिक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून १८ मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. श्वानांच्या मदतीनं अजूनही शोधमोहीम सुरुय. या भूस्खलनात अजूनही ९० सैनिक बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे.
ऑस्ट्रेलियात वणव्याने वनसंपदेचे नुकसान
ऑस्ट्रेलियातील जंगलात काही महिन्यांपूर्वी लागलेल्या वणव्यानं वनसंपदेचं मोठं नुकसान झालं. मात्र हा भाग पुन्हा हिरवागार करण्यासाठी वनविभागानं कंबर कसलीये. यासाठी वनविभागानं ड्रोनची मदत घेतलीये. ड्रोनच्या मदतीनं तब्बल ४० हजार प्रकारच्या स्थानिक झाडांच्या बियांची पेरणी इथं करण्यात आलीये. हजारो हेक्टर जंगलात नवी झाडं लावली जाणार आहेत.
कोलोरॅडोतील जंगलात वणवा
तर दुसरीकडे कोलोरॅडोतील जंगलात लागलेला वणवा अद्यापही शमलेला नाही. ७ हजार एकरावरील वनसंपदा या वणव्यात जळून खाक झालीये. बोल्डर काउंटीत वणव्याचा सर्वाधिक फटका बसलाय. बोल्डर काउंटीच्या आयुक्तांनी स्थानिक आपात्कालीन आपत्तीच्या घोषणेवर स्वाक्षरी केली.. तसंच जंगलालतच्या रहिवाशांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तरच कोरोना लस नागरिकांना
कॅलिफोर्नियात कोरोनाच्या नव्या लसच्या सुरक्षा आणि वितरणावर लक्ष ठेवण्यासाठी तज्ज्ञांचे पथक तैनात करण्यात आले आहे. राज्यपाल गॅव्हिन न्यूजम यांनी याची माहिती दिलीये. या पथकात ११ सदस्य आहे. या पथकाने परवानगी दिल्यानंतरच कोणतीही लस नागरिकांना वितरीत केली जाणार आहे.
फायरब्रेक लॉकडाऊन जाहीर
वेल्समध्ये दोन आठवड्यांचा फायरब्रेक लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. लॉकडाऊन दरम्यान केवळ अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आलीये. अनेकांना वर्कफ्रॉम होमची सुविधा देण्यात आलीये. पर्यटन तसंच धार्मिक स्थळंही बंद ठेवण्यात आलीत. ९ नोव्हेंबरपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे.