धोका! ...तर हिमालय वितळणार
भारतात दुष्काळाची स्थिती निर्माण होईल
मुंबई : साऱ्या जगाचं लक्ष वेधणाऱ्या हिमालयाच्या पर्वरांगा म्हणजे निसर्गाची एक अभूतपूर्व देणगीच आहे. पण, येत्या काही वर्षांमध्ये याच हिमालयाचं अस्तित्व धोक्यात येणार आहे. जागतिक हवामानात होणारे बदल पाहता येत्या काळात हिमनद्या वितळून पुरसदृश्य परिस्थितीचं संकटही ओढवणार असल्याची चिंता एका अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. त्यासोबतच हवामान बदलामुळे भारतात दुष्काळाची स्थिती निर्माण होईल असंही या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.
२०९०च्या आसपास एव्हरेस्ट शिखरासह हिमालयातल्या हिमनद्या वितळणार असा अहवाल आंतरराष्ट्रीय संस्थेकडून देण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत झालेली तापमानवाढ पाहता त्यामुळे हिमालयातील अनेक हिमनद्या सातत्यानं वितळतत आहेत. हे असंच घडत राहिल्यास येत्या काही दशकांमध्ये हिमालयातील जवळपास एक तृतियांश बर्फ वितळण्याची भीती आहे. ज्यामुळे हिमालयाचं सौंदर्य तर नष्ट होईलच शिवाय वितळलेल्या बर्फामुळे हिमालयीन रांगांमध्ये पूरस्थिती ओढावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हिमालय हा पृथ्वीचा तिसरा ध्रुव मानला जातो असं म्हणत पर्यावर तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी या विषयीची विस्तृत माहिती दिली. हिमालयाला हानी पोहोचल्यास त्याच्या सभोवताली असणाऱ्या एकूण सात देशांनाही याचा धोका असल्याचं ते म्हणाले. भारत, चीन, पाकिस्तान, अफगाणिस्तान, भूटान आणि ब्रह्मदेश या सर्व देशांनी मिळून हिमालयाची होणारी हानी रोखण्यासाठी काही गंभीर पावलं उचलण्याची वेळ आता आल्याची महत्त्वपूर्ण बाब त्यांनी 'झी 24 तास'शी संवाद साधताना मांडली. पर्यावरणाची होणारी हानी पाहता एकजुटीने काही पावलं उचलण्याची गरज असल्याचं म्हणत उत्तर आणि दक्षिण ध्रुवासोबतच हिमालयाच्या पर्वतरांगांमधील तापमान जवळपास २ ते अडीच अंशांनी वाढलं असून ही चिंताजनक गोष्ट आहे याकडे त्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं.
सध्याच्या घडीला हिमालयात दोनशे तलाव निर्माण झाले आहेत. हिमनद्यांच्या वितळण्यामुळे ही परिस्थिती उदभवली आहे. ज्यामुळे येत्या काळात हवामानात लक्षणीय बदल होणार असून, थंडी, उष्णता यांच्यासह पिकांवरही या साऱ्याचा थेट परिणाम होणार आहे. त्यामुळे सृष्टीचा हा कोप टाळण्याच्या दृष्टीने आता पावलं उचलण्याची गरज प्रकर्षाने जाणवू लागली असून, त्यावरच पर्यावरण अभ्यासकांचा भर दिसत आहे.