नवी दिल्ली : मुंबईचा गुन्हेगार आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी हाफिज सईदभोवतीचा फास आवळण्यास सुरूवात झालीय.एकीकडे दहशतवाद्यांच्या यादीतून सईदचे नाव हटविण्याची याचिका संयुक्त राष्ट्राने फेटाळली. दुसरीकडे पाकिस्तानमधील पंजाब सरकारने लाहोरमधील जमात-उद-दावाचे मुख्यालय आणि फलाह-ए-इन्सानियत या कार्यालयाचा ताबा घेतला आहे. हाफिज सईद हा जमात-उद-दावाचा म्होरक्या आहे. याशिवाय लाहोरमधील जमात-उद-दावाचे मदरसे आणि मशिदीचाही पाकिस्तान सरकार ताबा घेणार आहे. लष्कर-ए-तोएबाचे पिल्लू असलेल्या जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेच्या सर्व संस्थांवर पाकिस्तान कारवाई करणार असल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. 


दरम्यान, याआधी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईद याला पाकिस्तानने जोरदार दणका दिला आहे. त्याच्या उद-दावा या दहशतवादी संघटनेवर भारताच्या दबावानंतर पाकिस्तानने बंदी घातली आहे, असे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत ही बंदी घातली आहे. जमात उद-दावासोबतचा हाफिज सईदच्याच फलाह-ए इन्सानियत या संस्थेवर देखील बंदी घालण्यात आली आहे.