तेहरान : तेहरान आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही वेळात कोसळलेल्या युक्रेनच्या विमान अपघातात तब्बल १७६ जणांचा जीव गेला. सुरुवातीला तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळल्याचं सांगितलं जात होतं. परंतु, आता मात्र इराण सरकारनं युक्रेनचं विमान पाडल्याची जबाबदारी स्वीकारलीय. इराणी मिसाइलनं चुकीनं युक्रेनच्या विमानाला पाडल्याचं, इराण सरकारकडून जाहीर करण्यात आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नकळत हल्ल्याच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या विमानात १७६ नागरिक होते. त्यात बहुतांशी कॅनडा आणि इराणचे नागरिक होते. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन या देशांनी अपघातानंतर इराणनंच विमानाला निशाणा बनवल्याचा दावा केला होता.



युक्रेनचं विमान मानवी चुकीमुळे निशाण्यावर आलं. अनावधानानं हे विमान पाडलं गेलं आणि त्यात तब्बल १७६ जणांचा बळी गेला, असं आता इराणनं जाहीर केलंय. 



इराण सैन्याचे कमांडर कासिम सुलेमानी यांचा अमेरिकेच्या एअर स्ट्राईकमध्ये मृत्यू झाल्यानंतर प्रत्यूत्तरादाखल केलेल्या कारवाईत इराणनं इराकमध्ये असलेल्या अमेरिकन एअरबेसवर मिसाइलनं हल्ला केला होता. याच दरम्यान युक्रेनचं विमान कोसळलं होतं. त्यानंतर शुक्रवारी 'इरामच्या मिसाईलमुळे युक्रेनचं विमान पडलं नाही' असा दावा इराणनं केला होता. मात्र, अमेरीका-कॅनडाच्या दबावानंतर आता ही मानवी चूक होती आणि इराणच्या मिसाईलमुळेच युक्रेनचं बोइंग ७३७ विमान कोसळल्याचं इराणनं जाहीर केलंय.