वॉशिंग्टन : आधी युक्रेन-रशिया युद्ध, त्यात आता इराणचं हे वागणं पाहाता जग खरोखर महायुद्धाच्या दिशेने जात आहे का असा सवाल उपस्थित झाला आहे. अमेरिकेच्या इराकमधल्या दुतावासावर इराणने मिसाईल्स डागली. आता इराणच्या या आक्रमक कृतीला अमेरिका काय उत्तर देणार याकडे सर्वांच लक्ष आहे. परंतु त्याच्यातील हा वाद जास्त पेटला तर संपूर्ण जग महायुद्धाच्या दिशेने वाटचाल करण्याची शक्यता नाकारता येत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रशिया आणि युक्रेनच्या युद्धात आपण उतरणार नाही अशी भूमिका अमेरिका आणि नाटोने घेतल्यामुळे महायुद्धाची शक्यता धूसर झाली होती. पण अचानक इराकमधल्या अमेरिकेच्या दुतावासाजवळ 12 मिसाईल्सद्वारे हल्ला करण्यात आला. इराणमधील शिया मुस्लिमांच्या दहशतवादी गटाकडून हा हल्ला झाल्याचा आरोप अमेरिकेने केला.



इराकमधील कुर्दीस्तान या प्रांताची राजधानी इर्बिल या शहरात अमेरिकेच्या वाणिज्य दुतावास परिसरात मध्यरात्री क्षेपणास्त्र हल्ला झाला. दुतावासाजवळच इस्रायलचा गुप्तहेर संघटना मोसादचंही प्रशिक्षण केंद्र आहे. त्यावरही हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे.


इराणमधून 12 रॉकेट्स डागण्यात आली. यात दुतावासाच्या इमारतीचं नुकसान झालेलं नाही. अमेरिकन स्टाफपैकी कोणाचीही जीवितहानीही झालेली नाही. इराकच्या सार्वभौमत्वावरच हा हल्ला झालाय, हा हिंसाचाराचाच प्रकार आहे अशी प्रतिक्रिया अमेरिकेने दिला.


एकीकडे व्हिएन्नात अमेरिका आणि इराणच्या अण्वस्त्रांविषयी चर्चा सुरू असतानाच हा हल्ला झाल्याने वातावरण तंग झालंय. इराकमध्ये 2500 अमेरिकन सैनिक तैनात आहेत. आयसीसशी लढण्याच्या नावाखाली हे सैनिक इथे तैनात आहेत.


इराक आणि इराण यांच्यात 1980 ते 1988 अशी तब्बल 8 वर्षं युद्ध पेटलं होतं. त्यानंतर दोन्ही देश शांत होते. सध्याच्या इराकी सरकारवर अमेरिकेचं नियंत्रण आहे. त्यातच इराण हा रशियाचाही मित्र आहे.


एकीकडे रशियावरच्या निर्बंधांमुळे इराण आणि अमेरिका यांची व्हिएन्नातली चर्चा थांबलीय. त्यातच आता हा हल्ला झाल्यामुळे अमेरिकेला या युद्धात डिवचण्याचे आणि युद्धात खेचण्याचे प्रयत्न झाले असण्याची शक्यता आहे.


तसं झालं आणि अमेरिका या युद्धात उतरली तर मात्र मोठं युद्ध पश्चिम आशियात पेटण्याची भीती आहे. या युद्धाची भारतासारख्या इराणवर मोठ्या प्रमाणात तेलावर अवलंबून असलेल्या देशाला फार मोठी किंमत मोजावी लागेल.