एका सँडविचमुळे लंडनमधील भारतीय बँकरचा ९ कोटींचा जॉब धोक्यात
पाहा नक्की काय आहे हे प्रकरण...
नवी दिल्ली : एका सँडविचमुळे भारतीय बँकरची नोकरी धोक्यात आल्याची घटना समोर आली आहे. या सँडविचमुळे पारस शाह असं नाव असलेल्या बँकरचं लंडनच्या सिटी बँकेतून निलंबन करण्यात आलं आहे. सिटी बँकेकडून पारस यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईमुळे बँकिंग क्षेत्रात या घटनेची चांगलीच चर्चा असून मोठी खळबळ माजली आहे.
पारस यांच्यावर बँकेतील कँटिनमधून सँडविच चोरल्याचा आरोप लावण्यात आला आहे. परंतु सँडविच कधी चोरलं, किती वेळा आणि किती सँडविच चोरले याबाबत कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. सिटी बँक किंवा पारस शाह या दोघांकडूनही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
पारस सिटी बँकेच्या लंडनमधल्या केनेरी व्हार्फ येथील मुख्यालयात कार्यरत असल्याचं बोललं जातंय. पारस शाह लंडनमधील सिटी बँकेचे सिटीग्रुप हेड असल्याची माहिती मिळत आहे. त्यांचं वार्षिक वेतन जवळपास ९ कोटींच्या घरात असल्याचं बोललं जात आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी पारस यांनी त्यांच्या कँटीनमधून सँडविच चोरल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर सँडविच चोरल्याच्या आरोपाखाली बँकेने त्यांच्यावर कारवाई करत, त्यांचं निलंबन केल्याचं समोर आलं. मात्र याबाबत पारस शाह किंवा बँकेने कोणतंही वक्तव्य केलेलं नाही.