वॉशिंग्टन : आयसीसचा म्होरक्या आणि कुख्यात दहशतवादी अबू बक्र अल बगदादी याचा खात्मा कसा झाला, याचा व्हिडिओ जगासमोर आला आहे. अमेरिकेनं अत्यंत नियोजनबद्ध ऑपरेशनमध्ये बगदादीची अशी कोंडी केली की, बगदादीनं स्वतःला बॉम्बनं उडवून टाकलं. दहशतवादाचा क्रूर चेहरा बनलेल्या बगदादीचा शेवट अमेरिकेच्या जाँबाज कमांडोंनी केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगभरातील लाखो लोकांचं जीवन उद्धवस्त करणाऱ्या अबू बक्र अल बगदादीचा खात्मा कसा केला, त्याचे पुरावे अमेरिकेने दिले आहेत. ही दृश्यं पाहून कुणाही दहशतवाद्याचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही.


गेल्या २७ ऑक्टोबरला अमेरिकेनं ऑपरेशन बगदादी फत्ते केलं... त्याचा व्हिडिओ अमेरिकेनं पहिल्यांदाच रिलीज केलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बगदादीच्या मृत्यूचा व्हिडिओ जारी करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यांनी आपला शब्द खरा करून दाखवला.


सीरियातल्या बरीशा भागात अमेरिकेच्या डेल्टा फोर्सनं बगदादीचं काम तमाम केलं. या व्हिडिओत बगदादी नेमका कुठं लपून बसला होता, त्याचा ठावठिकाणा देखील स्पष्टपणे दिसतोय.


ऑपरेशन बगदादीचे तीन व्हिडिओ अमेरिकेनं जारी केलेत. पहिल्या व्हिडिओत अमेरिकेची हेलिकॉप्टर्स बगदादीच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्याचं दिसतंय. अमेरिकन हेलिकॉप्टर्स पाहताच दहशतवाद्यांनी फायरिंग सुरू केली.


या व्हिडिओत बगदादाची ठावठिकाणा दिसतोय. सोबत काही दहशतवादी देखील नजरेला पडतायत. त्यांनीच फायरिंग सुरू केली. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकन हेलिकॉप्टर्सनी रॉकेट हल्ला केला आणि सगळं उद्धवस्त करून टाकलं.


अमेरिकन डेल्टा फोर्सनं बगदादीची चारीबाजूनं नाकाबंदी केली. दुसऱ्या व्हिडिओत अमेरिकन कमांडो दिसतायत. दोन बाजूनं अमेरिकेचे ११ जाँबाज कमांडो बगदादी लपून बसलेल्या ठिकाणी घुसले. बगदादी ज्या कंपाऊंडमध्ये लपला होता, त्या घराच्या चारी बाजूला बाऊंड्री होती. आजुबाजूला छोटे छोटे तंबू होते. ओसामा बिन लादेनच्या एबटाबादमधल्या घरासारखंच वातावरण तिथं होतं. हेलिकॉप्टरमधून उतरून त्यांनी बगदादीच्या घरावर हल्ला केला.


आपली कोंडी झाल्याचं लक्षात येताच बगदादीनं सुरूंगामध्ये स्वतःला बॉम्बनं उडवलं. अमेरिकेच्या स्पेशल ऑपरेशन टीमनं बगदादी लपला होता ती जागाच उद्धवस्त करून टाकली. त्या जागेचा पुन्हा वापर होणार नाही, याची काळजी कमांडोंनी घेतली. तिसऱ्या व्हिडिओत रॉकेट हल्ल्यानं त्या घराची धूळधाण करण्यात आल्याचं स्पष्ट दिसतंय.


व्हिडिओत अमेरिकेचे कमांडो कंपाऊंड उद्धवस्त करताना दिसतायत. यात कंपाऊंडची आधीची आणि नंतरची दृश्यं आहेत. खड्डे पडलेल्या पार्किंग स्पॉटसारखं चित्र तिथं आता दिसतंय. या संपूर्ण ऑपरेशनला व्यवस्थित प्लान करण्यात आलं होतं आणि त्यानुसार मोहीम फत्ते करण्यात आली.


बगदादीनं स्वतःला बॉम्बनं उडवल्यानंतर अमेरिकन कमांडोंनी डीएनए नमुने गोळा केले. त्यानुसार बगदादी ठार झाल्याचं स्पष्ट झालं. बगदादीचा अंत झाला तेव्हा तिथं ३ नव्हे, तर २ मुलं देखील होती. त्यांचं वय १२ वर्षांपेक्षा कमी होतं. 


अमेरिकेच्या पेंटागन या संरक्षण विभागानं हे व्हिडिओ जारी केलेत. आपला शेवट जवळ आला तेव्हा बगदादी एका सुरूंगात लपून बसला होता. अमेरिकेच्या के ९ कमांडोंनी त्याचा पाठलाग केला.. आणि आता आपण वाचत नाही, याची खात्री पटल्यानंतर बगदादीनं स्वतःला बॉम्बनं उडवलं.