मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आंतरराष्ट्रीय राजकीय वर्तुळात असणारा प्रभाव नेमका आहे तरी कसा, याचीच प्रचिती सध्या इस्रायलमध्ये येत आहे. इस्रायलमध्ये अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकांच्या जाहिरातींच्या पोस्टरवर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही छायाचित्र पाहायला मिळत आहे. या फोटोंमध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि मोदी एकत्र दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इस्रायलमधील स्थानिक पत्रकार अमिचाई स्टेन यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये इमारतीवरील एका बॅनरवर हे दृश्य दिसत आहे. फक्त मोदीच नव्हे, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबतचे नेतन्याहू यांचे बॅनरही त्या ठिकाणी झळकत आहेत. 


इस्रायलमधील सार्वत्रिक निवडणुका १७ सप्टेंबर रोजी इस्रायलमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर नेतन्याहू यांचे मोदी, ट्रम्प आणि पुतीन यांच्या सोबतचे फोटो असलेले हे मोठे पोस्टर एक इमारतीवर लावण्यात आले आहेत. जागतिक स्तरावर प्रभावी नेतेमंडळीं आणि राष्ट्रांशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करत नेतन्याहू आपल्या देशाच्या बळकटीच्या दृष्टीने  विचार करत आहेत, हेच या जाहिरातबाजीतून भासवण्यात येत आहे. दरम्यान, सर्वाधिक काळासाठी इस्रायलच्या पंतप्रधानपदाची धुरा सांभाळणाऱ्या नेतन्याहू यांना या निवडणुकांमध्ये मात्र कडवे आव्हान आहे.  त्यामुळे मोदी फॅक्टर त्यांच्यासाठी कितपत फायद्याचा ठरतो, हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.