इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा डीपफेक व्हिडीओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. अमेरिकेतील अ‍ॅडल्ट वेबसाईटवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता. 40 वर्षीय आरोपीने आपल्या 73 वर्षीय वडिलांच्या मदतीने हा व्हिडीओ तयार करत अपलोड केला होता. दरम्यान याप्रकरणी पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. बीबीसीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोपींनी जॉर्जिया मेलोनी पंतप्रधान होण्याआधी म्हणजेच 2022 मध्ये हा डीपफेक व्हिडीओ तयार केला होता. आरोपींनी एका अ‍ॅडल्ट फिल्म स्टारच्या चेहऱ्यावर जॉर्जिया मेलोनी यांचा चेहरा लावला होता. याप्रकरणी दोन्ही आरोपींवर मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. 


हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. हा डीपफेक व्हिडीओ अपलोड करण्यासाठी मोबाईलचा वापर करण्यात आला होता. याच मोबाईलच्या आधारे पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले. दरम्यान जॉर्जिया मेलोनी यांनी याप्रकरणी 90 लाखांची नुकसान भरपाई मागितली आहे. तसंच 2 जुलै कोर्टात आपली साक्ष नोंदवणार आहेत. 


मेलोनी यांच्या वकील मारिया यांनी सांगितलं आहे की, पंतप्रधान मागत असलेली नुकसान भरपाई प्रतिकात्मक आहे. अनेक पीडित महिला या प्रकरणांमध्ये पुढे येत नाहीत. त्यांनी घाबरु नये आणि पुढाकार घ्यावा हाच संदेश त्यांना यातून द्यायचा आहे. जर नुकसान भरपाई मिळाली तर पंतप्रधान हिंसाचार पीडित महिलांसाठी ही रक्कम दान करणार आहेत.


मेलोनी यांच्या टीमकडून याप्रकरणी निवेदन जारी करण्यात आलं आहे. त्यात देण्यात आलेल्या माहितीनुसार, 2022 मध्ये अपलोड करण्यात आलेला हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. इटलीमधील कायद्यानुसार, काही अब्रुनुकसान प्रकरणी तुरुंगवासही होऊ शकतो. 


डीपफेक व्हिडीओ काय आहे?


सध्याच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात लोकांपर्यंत सहजरित्या चुकीची माहिती पसरवली जात आहे. अशाच प्रकारे बनावट व्हिडीओही तयार केले जात असून, त्याला डीपफेक म्हणतात. या व्हिडीओंमध्ये खरं आणि खोटं यातील फरक ओळखणं कठीण असतं. यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. 


यांचा वापर करत फोटो, ऑडिओ आणि व्हिडीओ अशाप्रकारे तयार केले जातात जे अगदी खरे वाटतात. सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास डीपफेक व्हिडीओ हे मॉर्फ व्हिडीओचं अत्याधुनिक रुप आहे. 


रश्मिका मंधानाच्या व्हिडीओमुळे डीपफेक आलं होतं चर्चेत


भारतात अभिनेत्री रश्मिका मंधानामुळे सर्वात आधी लोकांना डीपफेकची ओळख झाली होती. लिफ्टमध्ये एका तरुणीच्या चेहऱ्याला रश्मिकाचा चेहरा लावून हा व्हिडीओ तयार करण्यात आला होता. या व्हिडीओची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेत लोकांना गैरवापरापासून सतर्क राहायला सांगत, काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं.