Job Offer Of 1.3 Crore Goes Viral: तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? वर्षाला 1.3 कोटी रुपयांचं पॅकेज आणि महिन्यातून केवळ 10 दिवस काम करायचं अशी ऑफर तुम्हाला दिली तर तुम्ही काय मस्करी करताय वगैरे असं म्हणाल. पण खरोखर अशा जॉब ऑफरची एक जाहिरातच छापण्यात आली आहे. फक्त ही जाहिरात भारतात छापण्यात आलेली नसून ऑस्ट्रेलियातील आहे. ऑस्ट्रेलियामध्ये युनायटेड किंग्डममधील डॉक्टरांना नोकरीची ऑफर देत आमंत्रित करण्यात आलं आहे. यासाठी तब्बल 1.3 कोटींचं इयरली पॅकेजची ऑफर देतानाच महिन्यातून 20 दिवस सुट्टी दिली जाईल असंही म्हटलं आहे. 20 दिवसांच्या सुट्टीमध्ये 'भटका, स्विमिंगला जा किंवा सर्फिंगला जा' असं या जाहिरातीत म्हटलं आहे.


नेमकी कोणासाठी ऑफर?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रिटीश मेडिकल असोसिएशनच्या बीएमजी नावाच्या जर्नलमध्ये ही जाहिरात छापण्यात आली आहे. तसेच ही ऑफर स्वीकारणाऱ्यांना 12 महिने नोकरी करु असं लिखित दिल्यास साईन ऑन बोनस म्हणजेच नोकरी स्वीकारल्याबद्दल 5 हजार अमेरिकी डॉलर्स (भारतीय चलनानुसार 2.74 लाख रुपये) अतिरिक्त दिले जाणार आहेत. म्हणजेच या जॉब ऑफऱनुसार महिन्याचा पगार 10 लाख 83 हजार रुपये इतका आहे. युकेमधून नुकतीच डॉक्टरीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या डॉक्टरांना आकर्षित करण्यासाठी ही ऑफर देण्यात आली आहे. खास करुन अपघात आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यात माहीर असलेल्यांना प्रथम प्राधान्य दिलं जाणार आहे. अशा डॉक्टरांनी महिन्यातून केवळ 10 दिवसच काम करणं अपेक्षित आहे. उरलेल्या 20 दिवसांमध्ये, "भटकंती करा, स्विमिंगला जा किंवा सर्फिंग करा," असं या जाहिरातीत लिहिलेलं आहे. विशेष म्हणजे या डॉक्टरांची राहण्याची सोयही केली जाणार आहे. 


कोणी दिलीय ही जाहिरात?


ऑस्ट्रेलियामध्ये डॉक्टर नियुक्त करणाऱ्या बुल्गीबॉन कंपनीने ही जाहिरात दिली आहे. विशेष म्हणजे युकेमध्ये राष्ट्राध्यक्ष ऋषी सुनक आणि डॉक्टरांच्या नॅशनल हेल्थ स्कीम (एनएचएस) या संस्थेदरम्यान वेतनवाढीसंदर्भात वाद सुरु असतानाच ही जाहिरात देण्यात आली आहे. या जाहिरातीचा फोटो माजी वैद्यकीय तज्ज्ञ अॅडम की यांनी शेअर केला आहे. की यांचं नाव या जाहिरातीत वापरण्यात आलं आहे. "त्यांनी माझं नाव वापरण्यासंदर्भातील परवानगीही घेतली नव्हती," असं की म्हणाले आहेत. की हे 'दिस इज गोईंग टू हर्ट' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखकही आहेत. 'द इंडिपेंडण्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार 'दिस इज गोईंग टू हर्ट' या पुस्तकामध्ये की यांनी एनएचएसमध्ये काम करताना आलेल्या वाईट अनुभवांबद्दल भाष्य केलं आहे.



आमच्याकडे आरोग्य क्षेत्रातील नोकऱ्यांच्या बऱ्याच जागा रिकाम्या असून तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल असंही बुल्गीबॉन कंपनीच्या वेबसाईटवर म्हटलं आहे.